मुंबईत बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्याला गोव्याहून अटक

देशाची आर्थिक राजधानी मुंबई हिची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे सेवेत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्याला गोव्यातून अटक करण्यात आली आहे. एका मेसेजच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली होती.

मुंबईत 2006 साली लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटांमध्ये सुमारे 200 हून अधिक बळी गेले होते. त्यामुळे मिळालेल्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी ताबडतोब त्याचा माग काढायला सुरुवात केली. भांडुप येथील एका माणसाला त्याच्या मोबाईलवर हा संदेश आला होता. त्यात, उद्या नऊ वाजताचा बेत आहे. संपूर्ण ट्रेन भरलेली असेल. इन्शाअल्लाह, आपण आपला हेतू साध्य करू शकू. उद्या ट्रेनमध्ये गर्दी असेल आणि त्याच वेळी काम पूर्ण करावं लागेल. इथे सगळं ठिक आहे. काम झाल्यानंतर मालगाडीत भेटू. दहानंतर सगळे फोन बंद असतील.’ असं लिहिलं होतं.

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन भांडूप पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात कलम 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर या नंबरचा माग काढण्यात आला. गोव्यातील एकाने हा मेसेज पाठवल्याचं उघड झाल्यानंतर त्याला गोव्यातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस आणखी तपास करत आहेत.