मुंबई विद्यापीठाचा गोंधळी कारभार, विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील पानेच गहाळ

मुंबई विद्यापीठाचा गोंधळी कारभार सुरू असून विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिकांची अनेक पाने गहाळ होत आहेत. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणांवर झाला आहे. अनेकांना एटीकेटी लागल्या आहेत, तर काही जण नापास झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे उत्तरपत्रिका स्पॅनिंग वादात सापडले आहे.

बीई सिव्हीलच्या चौथ्या वर्षात शिकणाऱया एका विद्यार्थिनीने सातव्या सेमिस्टरची परीक्षा दिली होती. त्यात दोन विषयांत तिला कमी गुण आणि एटीकेटी लागली. त्यामुळे सदर विद्यार्थिनीने दोन्ही पेपर मुंबई विद्यापीठाकडे पुनर्तपासणीसाठी पाठवले. या विद्यार्थिनीला उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मिळाली असता त्यात उत्तरपत्रिकेतील अनेक पाने गहाळ झाल्याचे तिच्या निदर्शनास आले. या अर्धवट उत्तरपत्रिकेची तपासणी झाल्यास वर्ष वाया जाण्याची भीती सदर विद्यार्थिनीला आहे. विद्यापीठाकडून मिळालेल्या उत्तरपत्रिकेच्या पीडीएफ कॉपीमध्ये लिहिलेली उत्तरपत्रिकेची सर्व पाने दिसणे आवश्यक आहे. मात्र ती दिसत नसल्याने विद्यार्थिनीने चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे तक्रार केली आहे.

शिवसेना नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनानुसार परीक्षा विभाग संचालक डॉ. पूजा रौंदळे यांना सदर पंपनीवर योग्य ती कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

युवासेनेचा आरोप; मॅग्नेट कंपनीची विद्यापीठाकडून पाठराखण

मॅग्नेट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मागील दोन वर्षांपासून विद्यापीठाच्या परीक्षा विभागात उत्तरपत्रिका स्पॅनिंगचे काम करीत आहे. या कामात सातत्याने कंपनीकडून चुका होत आहेत. मात्र विद्यापीठ त्याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेने केला आहे. उत्तरपत्रिकांची पाने गहाळ होणे, विद्यार्थ्यांना चुकीच्या छायाप्रति देणे असे प्रकार सुरूच असतात. याबाबत युवासेनेने उपकुलसचिवांकडे तक्रार करूनही त्याचा काहीच परिणाम होत नसल्याचे युवासेना सहसचिव अॅड. संतोष धोत्रे यांनी सांगितले.