घड्याळाचा ठोका चुकला! राष्ट्रवादी नाव व चिन्हाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे प्रचार साहित्यात नमूद करा

राष्ट्रवादीतून फुटून बाहेर पडल्यावरही पक्षाचे नाव व चिन्हाचा वापर करून लोकसभा निवडणुकीत मतांची बेगमी करू पाहणाऱया अजित पवार यांच्या घडय़ाळाचा ठोका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे चुकला आहे. घडय़ाळ चिन्ह व राष्ट्रवादी कॉँग्रेस या नावाचा निवडणुकीत वापर करताना याबाबतचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याची नोटीस वर्तमानपत्रात प्रसिद्ध करा. तसेच प्रचार साहित्यातदेखील तसे नमूद करा, असे निर्देश न्यायालयाने अजित पवार गटाला दिले आहेत. तुतारी हे चिन्ह व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे नाव लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुकीतही वापरण्यास मुभा देत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला न्यायालयाने दिलासा दिला आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घडय़ाळ चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे घडय़ाळ हे निवडणूक चिन्ह तात्पुरते गोठवावे. अजित पवार गटाला हे चिन्ह दिल्यास ग्रामीण भागातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तूर्तास निवडणुकीत घडय़ाळ या चिन्हाचा वापर करण्यास अंतरिम स्थगिती द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली, मात्र न्यायालयाने सिंघवी यांची ही मागणी फेटाळून लावतानाच घडय़ाळ चिन्ह तसेच राष्ट्रवादी या नावामुळे होणारा संभ्रम टाळण्यासाठी याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे लिहिणे अजित पवार गटाला बंधनकारक केले आहे. यामुळे निवडणूक काळात घडय़ाळ चिन्हाचा वापर मुक्तपणे करण्यावर निर्बंध आले आहेत.

इतर राज्यांतही शरद पवारांचा फोटो वापरू नका
शरद पवार यांचा फोटो आणि नावाचा वापर यापुढे करणार नाही असे हमीपत्र अजित पवार गटाकडून आज न्यायालयात सादर करण्यात आले. दरम्यान, न्यायालयाने महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांतही शरद पवारांचे फोटो आणि नाव वापरणार नाही असे हमीपत्र सादर करा, असे निर्देश दिले आहेत.

पक्षचिन्ह व नावाबाबत पब्लिक नोटीस द्या
घडय़ाळ या चिन्हामुळे निवडणुकीत होणारा संभ्रम टाळण्यासाठी अजित पवार गटाने हिंदी, इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रांमध्ये पब्लिक नोटीस द्यावी. तसेच निवडणूक प्रचाराच्या सर्व प्रकारच्या जाहिरातींमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि पक्षाच्या घडय़ाळ चिन्हाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे स्पष्टपणे नमूद करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

शरद पवार यांना दिलासा; पक्षाचे नाव आणि चिन्ह राखीव
पेंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले. हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्यात यावे. त्यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह राखीव ठेवण्यात यावे. ते अन्य कुणालाही देण्यात येऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने पेंद्र व राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.