गोडसेबाबतच्या अभिजीत गंगोपाध्याय यांच्या वक्तव्याने जयराम रमेश संतापले; उमेदवारी रद्द करण्याची मागणी

कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि अभिजीत गंगोपाध्याय यांनी पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांना उमेदवारी दिली. मात्र, आता गंगोपाध्याय महात्मा गांधी आणि नुथराम गोडसे यांच्याबाबत केलेल्या एका विधानामुळे अडचणीत आले आहेत. काँग्रेसने त्यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेत त्यांची लोकसभेची उमेदवारी परत घ्यावी, अशी मागणी भाजपकडे केली आहे.

एका बंगाली वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्याबाबत मत व्यक्त केले होते. मी विधी क्षेत्रातून आलो आहे. प्रत्येक प्रकरणाची दुसरी बाजू असते, ती जाणून घेणे मला महत्त्वाचे वाटते. नथूराम गोडसे यांचे साहित्य वाचून त्यांनी महात्मा गाधींची हत्या करण्याचा निर्णय का घेतला? हे जाणून घेण्याची मला गरज वाटते. तोपर्यंत मी गांधी आणि गोडसे यांच्यापैकी कुणा एकाची निवड करणार नाही. गोडसे यांनी हत्या करण्याचा निर्णय का घेतला? त्या कारणांच्या मुळाशी जायला हवं, असे गंगोपाध्याय यांनी म्हटले होते. अभिजीत गंगोपाध्याय यांच्या या विधानावर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश संतापले आहेत.

रमेश यांनी एक्सवर पोस्ट करत गंगोपाध्याय यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. रमेश म्हणाले की, कलकत्ता उच्च न्यायालयाचा माजी न्यायाधीश, ज्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला. ज्यांना पंतप्रधानांचा थेट आशीर्वाद आहे. तसेच ते भाजपाचे उमेदवार आहेत. अशा व्यक्तीने गांधी किंवा गोडसे यांच्यापैकी एकाची निवड करू शकत नाही, असे म्हणणे संतापजनक आहे. गंगोपाध्याय यांचे विधान आक्षेपार्ह असून त्यांनी महात्मा गांधी यांचा वारसा जपण्यासाठी कोणताही प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी जयराम रमेश यांनी केली आहे.