Nitin Desai Suicide – एनडी स्टुडिओ, जगभरातील पर्यटकांचे आकर्षण; दीडशे स्थानिकांना रोजगार देणारा मसीहा

नितीन देसाई यांनी कर्जत-चौक मार्गावर एनडी स्टुडीओ उभारल्यानंतर परिसरातील आदिवासी वाडी आणि चौक गावातील तब्बल दीडशे तरुणांना  रोजगार मिळाला होता. या गावकऱ्यांशी देसाई यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांना ते नेहमी मदत करत. देसाई यांच्या निधनाने दीडशेहून अधिक तरुणांचा रोजगार हरपला असून त्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे.

नितीन देसाई यांनी 2005 मध्ये खालापूर तालुक्यात कर्जतजवळ एन. डी. स्टुडिओ उभारला. एक भव्य कलासृष्टी येथे आकाराला येऊ लागली. हा स्टुडिओ मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांपासून समान अंतरावर आणि हमरस्त्याला लागून आहे. शेजारीच मोरबे धरणाचा सुंदर परिसर, सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत. कर्जतचे कलापूर समजल्या जाणारा 52 एकरवरील  एन.डी. स्टुडिओ पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

आमीर खानचा ‘द रायझिंग’ हा येथे चित्रित केला गेलेला पहिला भव्य चित्रपट. त्यानंतर या स्टुडिओने मागे पाहिले नाही. मधुर भांडारकर यांचा गाजलेला ‘ट्रफिक सिग्नल’ हा त्यानंतरचा महत्त्वाचा चित्रपट होता.

ऐतिहासिक वातावरणाने भालेला कालखंड असेल किंवा शहरीकरणाची मजा असेल, सारं काही एन.डी. स्टुडिओत उभे राहिलं.  ‘जोधा अकबर’सारखा पीरियड ड्रामा असणारा चित्रपटही येथेच चित्रित झाला. आग्र्याचा भव्य किल्ला तिथे दिमाखात उभा राहिला.  ‘राजा शिवछत्रपती’ सारखी दूरचित्रवाणीमधील आजवरची सर्वात भव्य मालिका जवळपास संपूर्णपणे येथेच चित्रित झाली. स्वराज्याची राजधानी, शिवरायांचा दरबार,  राजगड, पन्हाळा, रायगड, शिवनेरीसारखे किल्ले उभे केले गेले आणि ते आजही मालिका संपून गेल्यानंतर त्याच दिमाखात जतन केले गेले आहेत. ‘ग्रेट कॉमेडी सर्कस’, ‘बिग बॉस’सारख्या अनेक लोकप्रिय आणि भव्य मालिकांचे निर्माण येथे झाले आहे. ‘महाराणी पद्मिनी’, ‘झाशीची राणी’ या मालिकांची निर्मिती एन.डी. स्टुडिओने केली होती.

गणपती, शिमग्याला न चुकता गावाला हजेरी, पाचवली ग्रामस्थ शोकसागरात

दरवर्षी न चुकता गणपती आणि शिमग्याला दापोलीजवळील पाचवली गावात नितीन देसाई यांची हजेरी असायची. अलीकडेच जून महिन्यात ते एका कामासाठी गावी गेले होते. त्यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करताना त्यांनी ‘मी गणपतीला पुन्हा गावी येतोय. त्यावेळेला आपण पुढची चर्चा करू’ असे त्यांनी सांगितले होते. पाचवली हे नितीन देसाई यांचे मूळ गाव. गावचा आधार असलेल्या देसाई यांच्या जाण्याने पाचवली ग्रामस्थ शोकसागरात बुडाले आहेत.

पाचवली गावाशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली होती. त्यांनी गावात श्री हनुमानाचे भव्य असे मंदिर बांधले आहे. ते दरवर्षी गणपती आणि शिमगोत्सव या दोन सणांना गावी जायचे. प्रत्येक ग्रामस्थांसोबत त्यांचे जिव्हाळय़ाचे संबंध होते. नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांना मोठा धक्का बसला. सुरुवातील कुणाचाही विश्वास बसत नव्हता. पाचवलीमध्ये राहणारे त्यांचे काका अंकुश देसाई आणि काकी हे दोघेही तत्काळ मुंबईकडे रवाना झाले असून अंत्यसंस्काराची वेळ कळताच गावातील इतर ग्रामस्थही मुंबईला पोहोचणार आहेत. दरम्यान, नितीन देसाई यांनी गावाशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही. गावच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा असे ग्रामस्थ सांगतात. शिवाय कोकणातील परंपरेप्रमाणे गणपतीमध्ये ते गावातील घरांमध्ये भजनासाठी उपस्थित राहायचे. त्यांनी गावात ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा कार्यक्रमही केला होता.

जीवन संपवण्याआधी देसाई यांनी का बनवला दोरीचा धनुष्यबाण?

नितीन देसाई आत्महत्याप्रकरणी आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नितीन देसाई यांनी गळफास घेण्यापूर्वी जमिनीवर दोरीच्या साहाय्याने एक धनुष्यबाणाची प्रतिकृती बनवली होती. या धनुष्यबाणात बाणाचं टोक असलेल्या ठिकाणच्या अगदी वर त्यांनी गळफास घेतलाय. नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी बनवलेल्या धनुष्यबाणाचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या राजा शिवछत्रपतीया पुस्तकाचे प्रकाशन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, लता मंगेशकर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते