निफ्टीनं रचला नवा इतिहास; शेअर बाजारात 1,000 अंकाची वाढ

गुरुवारी हिंदुस्थानचे इक्विटी निर्देशांक तेजीत होते. दुपारी 2.36 वाजता शेअर बाजारात निर्देशांकानं 986 अंकांनी उसळी घेतली. म्हणजेच निर्देशांक 1.33 टक्क्यांनी वाढून 75,206 वर पोहोचला. तर निफ्टी 303 अंकांनी म्हणजेच 1.33 टक्क्यांनी वाढून 22,900 अंकांवर पोहोचला होता.

22,794 अंकांचा आपला विक्रम ओलांडण्याची निफ्टीची ही पहिलीच वेळ आहे. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांकही आतापर्यंतच्या उच्चांकावर आहे.

निफ्टी मिडकॅप निर्देशांक 238 अंकांनी म्हणजेच 0.46 टक्क्यांनी वाढून 52,405 अंकांवर आणि निफ्टीचा स्मॉलकॅप 27 अंकांनी म्हणजे 0.17 टक्क्यांनी वाढून 16,909 अंकांवर पोहोचला आहे.

गुरुवारी जाहीर झालेल्या HSBC फ्लॅश पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स (PMI) डेटानुसार, हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेने निर्यातीत विक्रमी वाढ केली आणि मे महिन्यात जवळपास 18 वर्षांतील रोजगारामध्ये सर्वात मोठी वाढ झाली, ज्यामुळे बाजारात तेजी आली आहे.

निर्देशांकांमध्ये ऑटो, आयटी, पीएसयू बँक, फिन सर्व्हिसेस, रियल्टी, प्रायव्हेट बँक्स आणि इन्फ्रा यांचे निर्देशांक वधारले आहेत. फार्मा, एफएमसीजी, मेटल आणि एनर्जी या प्रमुख क्षेत्रांमध्ये पिछाडीवर आहे.

ॲक्सिस बँक, एल अँड टी, मारुती सुझुकी, एम अँड एम, इंडसइंड बँक, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, टायटन आणि आयसीआयसीआय बँक हे आघाडीवर आहेत. सेन्सेक्समध्ये सन फार्मा, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी आणि टाटा स्टील हे सर्वाधिक घसरले.