80 कोटी जनता रेशनचे धान्य खाते हे लाजिरवाणे! प्रा. नितीन बानुगडे यांचा भाजपवर हल्लाबोल

जर देशातील 25 कोटी जनता दारिद्रय़रेषेच्या बाहेर काढली असेल, तर आपण देशातील 80 कोटी जनतेला रेशनचे स्वस्त धान्य का पुरवता, असा सवाल करत देशातील 80 कोटी जनता रेशनचे धान्य खाते हे अभिमानास्पद नव्हे, तर लाजिरवाणे आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील केंद्रातील भाजप सरकारवर केला.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार सत्यजित पाटील (आबा) यांच्या प्रचारार्थ बागणी व बावची येथे झालेल्या सभेत बानुगडे-पाटील बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते प्रतीक पाटील, शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अभिजीत पाटील, वैभवराव शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, सुनीता देशमाने, संग्राम जाधव, देवराज देशमुख, सरपंच तृप्ती हवलदार आदी उपस्थित होते.

प्रा. नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, ‘इंग्रज व्यापारी म्हणून आपल्या देशात आले आणि राज्यकर्ते बनले. त्यांनी 150 वर्षे देश लुटून नेला. भाजपवाले राज्यकर्ते म्हणून सत्तेवर आले आणि व्यापारी बनून देश लुटत आहेत. त्यामुळे आपल्याला सावध व्हायला हवे. हे भाजप सरकार मूठभर श्रीमंतांचे सरकार आहे. या शेतकरी विरोधी सरकारला या निवडणुकीत खाली खेचा,’ असे आवाहन त्यांनी केले.

उल्हास पाटील म्हणाले, ‘देशातील लोकशाही वाचवून देश पुन्हा प्रगतिपथावर नेण्याची मोठी जबाबदारी आपणास या निवडणुकीत पार पाडायची आहे. आम्ही विद्यमान खासदारांना शिवबंधन बांधून दोन महिन्यांत खासदार केले, त्यांनी दोन वर्षांत गद्दारी केली. आपण ज्यांचा प्रचार केला, त्यांनी कशी दिशाभूल केली, हे आपण पाहिले. शिरोळची जनता त्यांना झटका देऊन सत्यजित पाटील यांच्या विजयात मोठे योगदान करेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रतीक पाटील म्हणाले, ‘महागाई आणि जीएसटीने सामान्य माणूस त्रस्त असून, तरुणांच्या हाताला काम नाही. भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. देशातील जनतेची थट्टा करणारे सरकार उलथवून लावण्यासाठी विक्रमी मतदान करा. सत्यजितआबांना सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण आहे. ते निश्चितपणे आपल्या प्रश्नांना न्याय देतील,’ असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे संजय पाटील, शिवसेनेचे शकील सय्यद, सुभाषराव हवलदार, एल. बी. माळी, राजेंद्र पवार, भगवान पाटील, सतीश काईत, कुमार माळी, बी. के. पाटील, शशिकांत तगारे, बावचीचे विजयराव यादव, बाळासाहेब कोकाटे, वैभव वसंतराव रकटे, लालासो अनुसे, संजय पाटील, नितीन पाटील, कविता अनुसे, सुवर्णा यादव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मतदार मोठय़ा संख्येने उपस्थित होते.