आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पतंग, फटाके उडवायला बंदी

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजुबाजूच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात उंच उडणारे फटाके उडवणे, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तू सोडणे, पतंग उडवणे आणि लेझर बीम प्रकाशित करणे, फुगे, पॅराग्लायडर्स उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत लागू करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त, विशाल ठाकूर यांनी दिली आहे.

कोणत्याही विमानाच्या लॅण्‍डीग, टेक ऑफ आणि येण्याजाण्यामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या वस्तूंचा वापर केल्याचे लक्षात येताच कोणतीही व्यक्ती जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती देऊ शकेल, असेही या परिपत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल.