छातीठोकपणे खोटे बोलणारे मिंधे सरकार तोंडावर आपटले

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भरपूर कर्मचारी वर्ग उपलब्ध असून कोणत्याही गोष्टींची कमतरता नाही, असे छातीठोकपणे खोटे बोलत दिल्लीदरबारी मुजरा झाडण्यासाठी गेलेले मिंधे सरकार तोंडावर आपटले आहे. प्रत्यक्षात रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात 72 बालकांवर उपचार सुरू असून त्यांच्या देखभालीसाठी केवळ दोन नर्स उपलब्ध असल्याचे उघड झाले आहे.

नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात औषधांचा भयंकर तुटवडा असून, अपुरा कर्मचारीवर्ग असल्याने रुग्णांची आबाळ होत आहे. असे असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात कोणतीही कमतरता नसल्याचा दावा केला होता. काही तासांतच मुख्यमंत्र्यांचा दावा सपशेल खोटा असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले.

शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 20 हून अधिक नवजात बालकांचा समावेश असून, अजून 72 बालके अत्यवस्थ आहेत.  वॉर्मरची संख्या कमी असल्याने एका वॉर्मरमध्ये तीन-तीन बालकांना ठेवण्यात येत असल्याने संसर्गाची शक्यताही नाकारता येत नाही. कुणाला इंजेक्शन द्यावे, कुणाला सलाईन लावावे, कुणाला औषध द्यावे… हे सर्व करताना या दोन नर्सची प्रचंड धावपळ उडत असल्याची स्थिती आहे. बालरुग्ण कक्षामध्ये केवळ सहा वॉर्मर मशीन कार्यरत असून  गोडाऊनमध्ये 50 वॉर्मर मशीन धूळ खात पडल्याचे चित्र आहे.

नागपुरातील रुग्णालयांत रोज  23 मृत्यू

नागपुरातील मेयो आणि मेडिकल हॉस्पिटलमध्ये गेल्या 24 तासांत 23 रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आकडा रोजचा असल्याची धक्कादायक कबुलीच देण्यात आली आहे. नागपूरच्या या दोन सरकारी हॉस्पिटलमध्ये रोजच्या मृतांची सरासरी 20 ते 22 आहे. या रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागात दाखल बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयांतून येतात. त्यांच्यावर उपचार सुरू केल्यानंतर 24 तासांतच त्यांचा मृत्यू होतो. अशी अनेक प्रकरणे आहेत, असे नागपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी सांगितले. तर मेयोचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे आणि मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी मात्र वेगळीच माहिती दिली. रोजची मृतांची संख्या पाच ते सहा असल्याचा दावा त्यांनी केला.

कोल्हापूर जिह्यात थोरला दवाखाना म्हणून प्रसिद्ध असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात (सीपीआर) सप्टेंबर महिन्यात तब्बल 228 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात 29 बालकांचाही समावेश आहे. येथे औषधांचा साठा पुरेसा असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. मृत्यूचा हा अहवाल पाहिल्यास या रुग्णालयात दिवसाला सात ते आठ जणांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे.

मिंधे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

सरकारमध्ये कोणाचा पायपोस कुणाला नाही. मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री माध्यमांसमोर धडधडीत खोटे बोलतात. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 41 बळी गेले असून यासाठी सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे संपूर्ण सरकारवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज बुधवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. रुग्णांची विचारपूस करून त्यांनी प्रशासनाशी चर्चा केली. त्यानंतर दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नांदेडच काय, संपूर्ण राज्यात आरोग्य व्यवस्थेचा अक्षरशः बोऱया वाजला आहे. एकीकडे रुग्णांना मोफत उपचाराच्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे रुग्णालयांची राजकीय कोंडी करायची, असे या सरकारचे उद्योग सुरू आहेत, अशी टीका  अंबादास दानवे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासन घेऊन दारोदार फिरत आहेत, पण त्यांना नांदेडात येण्यासाठी अजिबात वेळ मिळाला नाही. नांदेडात रुग्ण तडफडून मृत्युमुखी पडत होते तेव्हा मिंधे सरकार दिल्लीश्वरांना मुजरा घालत होते, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला.

राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर -अंधारे

राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असून ‘शासन आपल्या दारी’च्या नावाखाली सरकार पैसे उडवत आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी पैसे का नाहीत, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. ठाणे, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर रुग्णालयांतील बळी शासनाने घेतलेले असून आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केली.