व्यंकय्या नायडू, मिथुन चक्रवर्ती, वैजयंती माला यांना पद्म पुरस्कार प्रदान

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध मान्यवरांना पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि भरतनाटय़म नृत्यांगणा डॉ. पद्मा सुब्रमण्यम यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. डॉ. बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आला तर ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती आणि गायिका उषा उत्थुप यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय समाजसेवक डॉ. सीताराम जिंदल, हृदयरोगतज्ञ डॉ. तेजस मधुसूदन पटेल आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनाही पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. बॅडमिंटनपटू रोहन बोपण्णा यांना पद्मपुरस्कार प्रदान करण्यात आला.

पद्मविभूषण

माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, बिंदेश्वर पाठक, अभिनेत्री वैजयंती माला, तेलगू अभिनेता चिरंजीवी, प्रसिद्ध भरतनाटय़म नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम.

महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मभूषण तर सहा जणांना पद्मश्री

प्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त, माजी राज्यपाल राम नाईक, संगीतकार प्यारेलाल, हृदयरोग तज्ञ आश्विन मेहता, पत्रकार पुंदन व्यास आणि होर्मुसजी एन कामा या महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे, तर वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. मनोहर कृष्णा डोळे यांना, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातकील योगदानासाठी झहीर काझी, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी मेंदू रोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना तसेच व्यवसायाने बँकर असलेल्या कल्पना मोरपारिया यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.