अंमली पदार्थ विरोधी 20 कारवायांमध्ये 36 आरोपी अटक, 25 जणांना तडीपार करण्याचा जिल्हा पोलीस अधीक्षकांचा इशारा

अमली पदार्थाच्या विक्रीविरोधात पोलीसांनी धडक कारवाई केली असून आतापर्यंत 20 कारवायांमध्ये 36 आरोपी पकडण्यात आले. त्यापैकी 6 आरोपीवर तडीपारची कारवाई सुरु असून एकूण 25 आरोपींना तडीपार करू असे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी गेल्या दोन महिन्यात धडक कारवाई सुरु केली. अनेक ठिकाणी छापे घालून अमली पदार्थ जप्त करत 36 आरोपींना अटक केली. त्यापैकी एका आरोपीचा कस्टडीतच मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यानी दिली. पकडलेल्या आरोपीनी अंमली पदार्थ कोठून आणले याचा शोध सुरु आहे. काही आरोपीनी गांजा मिरज, सातारा येथून आणल्याचे सांगितले. तरीही त्याचा तपास अजून सुरूच आहे. पोलिसांनी केवळ कारवाईवर न थांबता अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांबाबत प्रबोधनही सुरू केले आहे. एक निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेतल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

सेक्स रॅकेट प्रकरणातील सर्वावर कारवाई करणार

काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी एका फ्लॅटवर धाड टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी अजून सुरु असून सर्व दोषीवर कारवाई करू असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यानी दिला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होत्या.