एक्युआयच्या लोच्यामुळे मुंबईत प्रदूषण वाढतेय

मुंबईत हवेचा दर्जा तपासणीसाठी लावण्यात येणारी ‘एअर मॉनेटरिंग सिस्टम’ बसवलेल्या ठिकाणी स्थानिक बाबींमुळे प्रचंड प्रदूषण वाढत आहे. शिवाय या सिस्टीमकडे वर्षानुवर्षे लक्षच दिले गेले नसल्याने या यंत्रणेमधून येणाऱया माहितीबाबत विश्वासार्हता कमी झाली आहे. यामुळेच मुंबईचा सरासरी ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ (एक्युआय) वाढत असल्याचे पालिकेने केलेल्या तपासणीत समोर येत आहे. त्यामुळे प्रदूषण मोजण्यासाठी बसवण्यात आलेल्या सर्व 28 ठिकाणांची तपासणी करून ‘एअर मॉनेटरिंग सिस्टम’च्या जागा सर्वसमावेशक ठिकाणी ही यंत्रणा बसवणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मुंबईत वाढलेल्या प्रदूषणासाठी प्रकल्पांच्या ठिकाणाहून बाहेर येणारी धूळ कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पालिकेने बांधकाम प्रकल्पांसाठी नियमावली जाहीर केली आहे. 23 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या 27 प्रकारच्या नियमांमध्ये सर्वाधिक निर्देश बांधकाम प्रकल्पांना देण्यात आले आहेत. यानुसार पालिकेने 3 नोव्हेंबरपासून स्कॉडच्या माध्यमातून सर्व वॉर्डमध्ये पालिकेने तपासणी, स्टॉप वर्क नोटीस, बांधकाम प्रकल्प सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. मुंबईत सद्यस्थितीत सुमारे सहा हजारांवर बांधकामे सुरू आहेत. दरम्यान, प्रदूषण मापक यंत्रणांच्या नोंदीनुसार मुंबईच्या हवेचा दर्जा मोजला जात आहे. मात्र ही यंत्रे बसवलेल्या ठिकाणी होणाऱया कामांमुळेच हे प्रदूषण वाढत असल्याचे समोर आल्यामुळे ही यंत्रे बसवण्याची जागा बदलण्यात येणार असून सर्वसमावेश नोंद होईल अशा ठिकाणी ही यंत्रे बसवण्यात येतील, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. ‘एअर मॉनेटरिंग सिस्टम’मध्ये चार यंत्रे पालिकेची असून 24 यंत्रे ‘सफर’ संस्थेची आहेत.

अशी होतेय तपासणी
1.पालिकेकडून मरोळ या ठिकाणी ‘एअर मॉनेटरिंग सिस्टम’ बसवलेल्या ठिकाणी तपासणी केली असता येथे प्रचंड प्रमाणात टाइल्स कटिंग केले जात असल्याचे निदर्शनास आले. यामुळे या ठिकाणच्या हवेचा दर्जा अत्यंत वाईट नोंद होत आहे.
2.अंधेरी येथे बसवलेल्या ‘एअर मॉनेटरिंग सिस्टम’च्या अगदी जवळ एका बेकरीची विषारी धूर ओकणारी चिमणी असल्याचे निदर्शनास आले. यामुळे या ठिकाणच्या हवेचा दर्जा प्रचंड खालावल्याचे निदर्शनास आले आहे.
3.भांडुप कॉप्लेक्स येथे उत्तम पर्यावरण असताना या ठिकाणीही एअर क्वालिटी इंडेक्स अधिक नोंदवला जात होता, मात्र तपासणी केली असता या ठिकाणच्या ‘एअर मॉनेटरिंग सिस्टम’जवळच शेकोटी पेटवण्याचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे.

अशी ठरते हवेची गुणवत्ता
1.हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ ‘एआयक्यू’ तपासला जातो. यामध्ये 0 ते 50 पर्यंत ‘एआयक्यू’ ‘अतिशय शुद्ध हवा’ मानली जाते.
2.51 ते 100 दरम्यान ‘एआयक्यू’ ‘समाधानकारक हवा’, 101 ते 200 दरम्यान ‘एआयक्यू’-‘मध्यम दर्जाची हवा’, 201 ते 300 पर्यंत ‘एआयक्यू’ – ‘खराब’ हवा समजली जाते.
3.तर 301 ते 400 ‘एआयक्यू’ – ‘अतिशय खराब’ तर 401 ते 500 ‘एआयक्यू’ असल्यास ‘हवेची स्थिती गंभीर’ असल्याचे मानले जाते.