निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी 15 मार्चला बैठक, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची धावपळ

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्य निवडणुक आयुक्त अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे जबर धक्का बसलेल्या मोदी सरकारची चांगलीच धावपळ सुरु झाली आहे. निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांची पदे भरण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीची 15 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता बैठक घेण्यात येणार आहे.

नियमांनुसार निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि याशिवाय दोन निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे फेब्रुवारीमध्ये निवृत्त झाले. तर दुसरे अरुण गोयल यांनी 9 मार्च रोजी अचानक राजीनामा दिला. त्यामुळे निवडणूक आयोगाची धुरा आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या खांद्यावर आहे. त्यातच लोकसभा निवडणुकांच्या तारखांची पुढील आठवडय़ात घोषणा होऊ शकते. त्यामुळे निवडणूक आयुक्तांची लवकरात लवकर नियुक्ती करण्यासाठी मोदी सरकारची घाई सुरु झाली आहे.

राजीव कुमार, अरुण गोयल यांच्यात मतभेद?

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार फेब्रुवारी 2025 मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यांच्यानंतर अरुण गोयल हे मुख्य निवडणूक आयुक्त होण्याच्या मार्गावर होते. गोयल यांचा कार्यकाळ 5 डिसेंबर 2027 पर्यंत होता. मात्र, गोयल आणि राजीव कुमार यांच्यात फाईलींवरून मतभेद होते, अशी माहिती निवडणूक आयोगातील सुत्रांकडून पुढे आली आहे. असे असले तरी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.