पत्रकारितेवर कोणाचा दबाव असता कामा नये ही लोकमान्यांची भूमिका होती!

टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. या पुरस्कारातून मिळालेली राशी आपण नमामी गंगे योजनेसाठी दान करणार असल्याचे जाहीर केले. पुणेरी पगडी घालून पंतप्रधान मोदी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे देखील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवार आणि त्यांचे पुतणे हे पुण्यात अजित पवार हे सार्वजनिक कार्यक्रमात एकाच मंचावर पहिल्यांदा एकत्र आले होते.

शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये पुणे जिल्हा आणि त्याचे देशासाठीचे महत्त्व विषद केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला. लाल महालात त्यांचे लहानपण गेले होते. छत्रपतींचे राज्य हे कोणा एकाचे राज्य नव्हते तर ते हिंदवी राज्य होते असे पवार यांनी म्हटले. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आता होते मात्र लाल महाल शाहिस्तेखानाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झाला होता याची आठवणही पवार यांनी करून दिली.

लोकमान्य टिळकांबाबत बोलत असताना पवार यांनी म्हटले की, “लोकमान्यांनी पत्रकारितेचे शस्त्र काढले. मराठी भाषेतील केसरी, आणि इंग्रजीतून मराठा साप्ताहीक सुरू केले. यामाध्यमातून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा उभा केला. लोकजागृतीचे काम त्यांनी केले होते. पत्रकारितेवर कोणाचा दबाव असता कामा नये, दबावातून पत्रकारिता मुक्त झाली पाहिजे. ती भूमिका टिळकांनी सातत्याने पाळली.” काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर या पक्षात दोन मतप्रवाहांची माणसे होते, एक जहाल आणि दुसरा मवाळ. यातील जहालांचे नेतृत्व हे लोकमान्य टिळकांनी केले होते. या देशासाठी टिळक आणि गांधींनी दिलेले योगदान आम्ही विसरू शकत नाही असे पवार यांनी म्हटले. या देशाच्या नवी पिढीला या कर्तृत्ववान दृष्टीच्या नेत्यांचा आदर्श अखंडपणे प्रेरणा देईल याची मला खात्री आहे असे ते म्हणाले. नरेंद्र मोदी यांची या पुरस्कारासाठी निवड झाली, त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याबद्दल त्यांचे अंतकरणापासून अभिनंदन करतो असे पवारांनी म्हटले.