Pune crime news – अल्पवयीनाकडून चोरीचे 10 मोबाईल जप्त

पुणे शहर परिसरात मोबाईल चोरीचे गुन्हे करणाऱ्या अल्पवयीन तरुणाला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे 10 मोबाईल जप्त केले असून वानवडी, हडपसर, चंदननगर, विमानतळ पोलीस ठाण्यातील 10 गुन्हे उघडकीस आले आहेत.

शहरात वाहन, मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या पार्शवभूमीवर मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासह गुन्हे घडू नयेत, यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्थानिक पोलिस, गुन्हे शाखेच्या पथकांनी हद्दीत गस्त वाढवली आहे. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट पाचचे पथक हद्दीत गस्तीवर होते. यादरम्यान हडपसरमधील ससाणेनगर भागात एकजण संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे चोरीचे मोबाईल असल्याची माहिती युनिट पाचच्या पथकाला मिळाली.

त्यानुसार पथकाने सापळा रचून अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे दहा मोबाईल जप्त केले. चोरीच्या मोबाईलबाबत त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने त्याच्या एका साथीदारासह हे मोबाईल चोरल्याचे कबूल केले. यानुसार पोलिसांनी संबंधित अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले. तर, त्याच्या साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.

गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट पाचचे पोलीस निरीक्षक महेश बोलकोटगी, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, अंमलदार अश्रुबा मोराळे, रमेश साबळे, राजस शेख, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, दाऊद सय्यद यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.