काही ‘वंदे भारत’चे भाडे कमी होण्याची शक्यता

कमी अंतराच्या काही वंदे भारत ट्रेनचे भाडे कमी करण्याचा रेल्वे विभाग विचार करत आहे. ज्या वंदे भारत ट्रेनना अल्प प्रतिसाद मिळतोय अशा ट्रेनचे भाडे प्रामुख्याने कमी करण्याबाबत विचार सुरू आहे. भाडे कमी झाल्यास अधिकाधिक लोकं या ट्रेनने प्रवास करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. यामुळेच या ट्रेनच्या तिकीटाचे दर कमी करण्याबाबत विचार सुरू आहे.

ज्या मार्गांवर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या तिकीटाचे दर कमी करण्याचा विचार सुरू आहे त्यामध्ये इंदूर-भोपाळ, भोपाळ-जबलपूर, नागपूर-बिलासपूर या मार्गांचा समावेश आहे. भोपाळ-जबलपूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारतमधील अवघ्या 29 टक्के सीट भरल्या जात आहेत.इंदूर-भोपाळ मार्गावरील वंदे भारतमधील अवघ्या 21 टक्के सीट भरल्या जात आहेत. या मार्गावरील एसीचे तिकीट हे 950 रुपये इतके आहे तर एक्झिक्युटीव्ह चेअर कारचे तिकीट 1525 रुपये इतके आहे. तिकीटांच्या दराचे अवलोकन केल्यानंतर आणि दर कमी झाल्यानंतर अधिकाधिक प्रवासी या ट्रेनने प्रवास करतील आणि त्यामुळे उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा केली जात आहे. नागपूर-बिलासपूर या मार्गावर धावणाऱ्या ट्रेनचेही तिकीट कमी करण्याचा विचार सुरू आहे. या मार्गावरील ट्रेनमध्ये 55 टक्के सीट भरलेल्या असतात. जर तिकीटाचे दर कमी झाले तर या ट्रेनलाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा केली जात आहे. या मार्गावरील ट्रेनचे तिकीटाचे दर 1075 रुपये आणि 2045 रुपयेइतके आहेत.