किनवटमध्ये पावसाचा कहर! 80 लोकांना सुरक्षितस्थळी हलविले, धनोडा- माहूर रस्ता बंद

किनवट तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा कहर सुरूच असून, पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने शहराच्या मोमीनपुरा येथील 80 लोकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले आहे. तालुक्यातील सर्वच मंडळांत अतिवृष्टी असून, सिंदगी- मोहपुरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

तालुक्यात गुरुवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यानंतरही पावसाचा कहर सुरूच आहे. अतिपावसामुळे खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, घरांची पडझड झाली आहे. शुक्रवारी दिवसभर संततधार सुरु होती. शनिवारी पहाटे ते सकाळी उशिरापर्यंत पुन्हा मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरालगतची पैनगंगा नदी दुथडी भरून वहात असताना पुन्हा झालेल्या मुसळधार पावसाने नदीला पूर आला. यामुळे शहराच्या मोमीनपुरा, गंगानगर, नालागड्डा आदी सखल भागांत पाणी शिरले.

मोमीनपुरा भागातील लोकांच्या घरांत पुराचे पाणी शिरल्याने पालिका व तहसील प्रशासनाने एकूण 80 लोकांना जवळच्या उर्दु शाळेत हलविले. पैनगंगेचा पूर सध्या ओसरत आहे. तालुक्यातील सर्वच मंडळांत अतिवृष्टी असून, शनिवारी सकाळी संपलेल्या 24 तासात सिंदगी – मोहपूरमध्ये सर्वाधिक 220 मि.मी. पावसाची नोंद झाली. अतिपावसाने जमिनी खरडून गेल्या आहेत. खरिपाचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस ओसरताच कृषी व महसूल प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सहस्त्रकुंड धबधब्याकडे येणाऱ्या पर्यटकांना 2 दिवसांसाठी मनाई करण्यात आल्याचेही डॉ.जाधव यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे धनोडा – माहूर रस्ता बंद
माहूर आणि आसपासच्या परिसरात काल रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने माहूर, किनवट आणि सहस्त्रकुंड धबधबा आणि इतर पर्यटन क्षेत्रांना जनतेने पुढील दोन चार दिवस जाऊ नये असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. धानोडा ते किनवट कडे जाणाऱ्या पुलावर पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. माहूर जवळ टाकळी गावात पुरात अडकलेल्या जनतेला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने पथके रावना केली आहेत. किनवट येथील मोमीनपुरा वस्तीत पाणीच पाणी झाले आहे. त्या ठिकाणच्या 80 लोकांना उर्दू शाळेत हलवण्यात आले आहे.