अकरा वर्षापूर्वीच्या प्रकरणात म्हशीला उभे केले न्यायालयात, 13 सप्टेंबरला होणार पुढील सुनावणी

राजस्थानच्या जयपूरमध्ये एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. 11 वर्षापूर्वीच्या म्हैस चोरीप्रकरणी झालेली सुनावणी चर्चेचा विषय बनली आहे. या सुनावणी दरम्यान चक्क म्हशीला न्यायालयात उभे केले होते. त्यामुळे हे प्रकरण सगळीकडे चर्चेचा विषय ठरले होते. याप्रकरणाची पुढील सुनावणी 13 सप्टेंबरला होणार आहे.

राजधानी जयपूरच्या चोमू ठाणे अंतर्गत हरमाडा परिसरात राहणाऱ्या चरण सिंहने सांगितले की, 11 वर्षापूर्वी त्यांच्या तीन म्हशी चोरीला गेल्या होत्या. पोलिसांनी याप्रकरणी जेव्हा तपास सुरु केला भरतपूर परिसरात त्यांच्या दोन म्हशी सापडल्या. मात्र काही दिवसांनी त्यातल्या एका म्हशीचा मृत्यू झाला होता. दरम्यान सरकारी वकिलाने न्यायालयात सांगितले की, ओळख पटविण्यासाठी त्या म्हशीला न्यायालयात घेऊन यावे लागेल, यावर चरणसिंह यांनी आपल्या म्हशीला पिकअप गाडीत घालून न्यायालयाच्या आवारात आणले. न्यायालयात म्हशीला पाहून सर्व आवाक झाले. मात्र सुनावणीदरम्यान साक्षीदार सुभाषने आपल्या म्हशीची ओळख पटवली.

म्हशीची ओळख पटल्यानंतर परत तिच्या मालकाकडे सोपवण्यात आले. या संपूर्ण घटनेची पुढील सुनावणी 13 सप्टेंबर ला होणार आहे. न्यायालयाने सर्व पक्षांना बोलावले. याप्रकरणी ज्या चोराने म्हशीची चोरी केली त्यांना अटक केली असून सध्या तो जामिनावर बाहेर आहे.