प्राणपतिष्ठा सोहळ्याविरोधात याचिका, धार्मिक बाबींवर बोट ठेवत कार्यक्रमावर आक्षेप

अलाहाबाद उच्च न्यायालयात 22 जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. भोला दास यांनी ही याचिका दाखल केली असून ते उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी आहेत. दास यांनी म्हटले आहे की सध्या पौष महिना सुरू असून पौष महिन्यात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात नाही.

दास यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, “अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रामललाची मूर्ती अर्धवट बांधण्यात आलेल्या मंदिरात ठेवण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे या कार्यक्रमाचे प्रमुख आहेत. शंकराचार्यांनी प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. अपूर्ण मंदिरात देवाची प्राणप्रतिष्ठा केली जात नाही.” हा कार्यक्रम भाजपने आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आयोजित केल्याचा विविध राजकीय पक्षांनी आरोप केला आहे.