संगमनेरात कत्तलखान्यावर पुन्हा छापा; 2500 किलो गोमांस जप्त

संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यांमधून होणारी गोवंश हत्या कितीही छापे मारले तरी बंद होण्याचे नाव घेत नसून, सोमवारी मध्यरात्री पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने शहरातील अवैध कत्तलखान्यावर पुन्हा छापा मारला. या छाप्यात 2500 किलो गोवंश मांसासह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चारच दिवसांत छापा टाकण्याची ही दुसरी घटना आहे.

या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. सलीम जानमोहम्मद कुरेशी (वय 19, रा. सुभाषनगर, कोपरगाव. हल्ली रा. मदिनानगर, संगमनेर), कैश अशपाक कुरेशी (वय 22, रा. मदिनानगर, संगमनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर काशीफ असद कुरेशी (रा. मदिनानगर, संगमनेर) हा फरार झाला आहे. अटक केलेल्या दोन आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहरातील मदिनानगर भागात गल्ली क्रमांक दोन येथे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यानुसार कॉन्स्टेबल राहुल सारबंदे तसेच राहुल डोके यांच्यासह पथकाने मदिनानगर गल्ली दोनमधील एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. यावेळी कत्तल केलेले 2500 किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले. त्याची किंमत पाच लाख रुपये आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी कुऱहाड, चाकू, टोच्या व इतर हत्यारे जप्त केली आहेत.

पशुवैद्यकीय अधिकाऱयांसमोर पंचनामा करून गोमांस जागीच नष्ट केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारबंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.