निवडणुकीचे वारे… 24 तासांत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स हटवा

लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी शहर आणि दोन्ही उपनगरांत लावण्यात आलेले होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स 24 तासांत हटवण्याची कारवाई करा, असे निर्देश पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी प्रशासनाला दिले. शिवाय कोनशिला, नामफलक आदी झाकून टाकावेत आणि आचारसंहितेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱयांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.

आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी पालिका आयुक्तांनी आज पालिका अधिकाऱयांची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या. निवडणूक आयोगाकडून लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार, पालिकेच्या सर्व विभाग स्तरांवरील सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या विभागात कोणत्याही प्रकारचे विशेषतŠ राजकीय होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी. हे बॅनर, होर्डिंग काढून टाकल्यानंतर पुन्हा लावले जाणार नाहीत याची खात्री करण्यासाठी वारंवार पाहणी करावी, असे निर्देशही आयुक्तांनी दिले. प्रसंगी सार्वजनिक मालमत्ता अधिनियमानुसार पोलिसांत तक्रार दाखल करावी, असे निर्देशही आयुक्तांनी दिले. दरम्यान, मुंबई उपनगरांमध्ये मागील दोन दिवसांमध्ये 12 हजार 300 होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर्स आदी काढण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.