कोश्यारींचे प्रताप! अंबानींकडून 15 कोटी घेऊन रिसॉर्ट बांधला; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Bhagat singh koshiyari news –

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या कार्यकाळात अनंत अंबानी यांच्याकडून शिक्षणसंस्थेसाठी 15 कोटींची देणगी उकळल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. या देणगीची रक्कम कोश्यारी यांनी आपल्याच नातेवाईकाला रिसॉर्ट उघडण्यासाठी दिली असल्याचंही गलगली यांनी म्हटलं आहे.

एक्स पोस्टवर एक व्हिडीओ शेअर करून त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. या व्हिडीओत गलगली म्हणाले की, महाराष्ट्राचे वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या कार्यकाळात विविध संस्थांच्या नावे मोठ्या प्रमाणावर देणग्या गोळा केल्या. मात्र, त्यांचे कुठलेही तपशील राजभवनात उपलब्ध नाहीत. काही दिवसांपूर्वी आमच्याकडे एक निनावी पत्र आलं. त्या पत्रात असा दावा करण्यात आला की, उद्योगपती अनंत अंबानीकडून कोश्यारी यांनी अशा एका संस्थेसाठी देणगी गोळा केली, ज्यात 100 विद्यार्थी सुद्धा शिकत नाहीत. शिक्षा प्रचार समिती असं या संस्थेचं नाव आहे. या संस्थेचा स्टेट बँकेतील खात्याचा क्रमांकही सदर पत्रात नमूद करण्यात आला आहे. कोश्यारींचा दिपेंद्र सिंह कुशवाह नावाचा एक नातेवाईक असून त्याने त्याच पैश्यातून जमीन खरेदी करून त्यावर रिसॉर्ट सुरू केलं आहे, असा गंभीर आरोप गलगली यांनी केला आहे.

तसंच, हे प्रकरण संशयास्पद असून आम्ही त्याची तक्रार विद्यमान राज्यपाल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जर या प्रकरणाचा तपास झाला तर सत्य बाहेर येऊ शकेल, असं गलगली म्हणाले आहेत.

यापूर्वी देखील कोश्यारी यांच्या कार्यकाळातील व्यवहार आणि खर्चांविषयी गलगली यांनी प्रश्न उपस्थित केले होते. कोश्यारी यांच्या कार्यकाळात झालेल्या खर्चाविषयीही गलगली यांनी माहिती अधिकार वापरून राजभवनाकडे तपशील मागवले होते. त्यावेळी 2019नंतर अवघ्या दोन वर्षांत राजभवनाच्या खर्चात सुमारे 18 कोटींची वाढ झाल्याचा खुलासा झाला होता.