फक्त जाहिरातबाजीसाठी एसटीचा वापर, एसटी बसच्या दूरवस्थेकडे दुर्लक्ष; रोहित पवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

एसटीच्या बसेसवर राज्य सरकारच्या जाहिराती पाहायला मिळत आहेत. राज्यभर धावणाऱ्या या एसटी बसेसवर शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरात झळकत आहे. ‘निर्णय वेगवान आणि महाराष्ट्र गतीमान’ अशा मथळ्याखाली ही जाहिरात राज्यभरात दिसतेय. या जाहिरातबाजीवर राज्य सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. मोडकळीस आलेल्या किंवा दूरवस्था झालेल्या एसटी बसेसवरही ही जाहिरात चिकटवण्यात आली होती. अशा काही बसेसचे फोटो अलिकडे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे. आता आमदार रोहित पवार यांनीही एसटी बसेसच्या दूरवस्थेवरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

आमदार रोहित पवार यांनी एसटी महामंडळाच्या एका बसचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या बसचं छप्पर अर्धं निखळून उडत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रोहित पवार यांनी लिहिलं आहे की, राज्य सरकारकडून एसटीचा केवळ जाहिरातबाजीसाठी वापर केला जात आहे. जेव्हा राजकारण मूलभूत मुद्द्यांवर वरचढ होते, संस्थामध्येही राजकारणाचा शिरकाव होतो, तेव्हा विकास मात्र हरवतो. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. प्रवाशांना वेगवान सेवा देण्याऐवजी ‘निर्णय वेगवान आणि महाराष्ट्र गतीमान’ अशी केवळ जाहीरातबाजी करण्यापुरताच या सरकारकडून एसटीच्या बसेसचा वापर केला जात असल्याने मूलभूत प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.