महाराष्ट्राच्या रक्तात लढणे लिहिलेले! रोहित पवारांनी काकांविरुद्ध थोपटले दंड, भाजपचा उल्लेख करत म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार रोहित पवार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र काका अजित पवार यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे व्यथित झालेल्या रोहित पवार यांनी आपल्या मनातीत खदखद बोलून दाखवली.

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी शरद पवार यांचा हाथ सोडत शिंदे-फडणवीस सरकारची वाट धरली. रविवारी दुपारी राजभवनामध्ये अजित पवार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. यासोबत राष्ट्रवादीच्या आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. अजित पवारांसह शरद पवार यांच्या जवळचे काही नेतेही सत्तेत सहभागी झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. शरद पवार यांना हा मोठा धक्का होता. त्यामुळे पक्ष संघटन बळकट करण्यासाठी शरद पवार सोमवारी सकाळी कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेणार असून बंडखोर आमदारांविरोधात दंड थोपटणार आहेत. आमदार रोहित पवारही त्यांच्यासोबत असणार आहेत.

कराडला रवाना होण्यापूर्वी रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. काल जे काही घडले आणि महाराष्ट्रात वर्षभरात जे घडले ते पाहिल्यावर राजकारण गलिच्छ झाल्याचे आणि आपण मत देऊन चूक केली का असे मतदारांना वाटतंय. मतदारच नाही तर आमच्यासारखे नवीन आमदार एक ध्येय, विचार घेऊन राजकारणात आले होते. आता आम्हालाही कुठेतरी वाटतंय की राजकारणात येऊन चूक केली का? असा उद्विग्न सवाल रोहित पवार यांनी केला.

अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र ठरवा! राष्ट्रवादीची विधानसभा अध्यक्षांकडे याचिका

ते पुढे म्हणाले, लोकांच्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा इथे स्वत:बद्दल, स्वत:ची खुर्ची कशी टिकवता येईल आणि स्वत:चे उद्दिष्ठ कसे पूर्ण करता येईल यामध्ये सर्व गुंतून गेले आहेत. सामान्य लोकांचे प्रश्न बाजुलाच राहिले आहेत. या सगळ्या गोष्टी बघत असताना माझ्याही मनात विचार येतो की राजकारण करायचं की नाही… पण एक गोष्ट मनात कायम आहे. महाराष्ट्र लढच राहिलेला आहे.ही संतांची भूमि आहे, थोर व्यक्तींच्या विचारांनी पावण झालेली भूमी आहे… इथे लढणे हे सर्वांच्या रक्तात आहे. त्यामुळे तोच विचार पुन्हा बळ देतो.

अजित पवारांच्या बंडाबाबत कल्पना होती का? असे विचारले असता रोहित पवार म्हणाले की, ते जातील याचा अंदाज नव्हता. मात्र भाजप पक्ष फोडेल याचा काही प्रमाणात अंदाज होता. आज भाजपकडे लोकांचा पाठिंबा नाही, त्यामुळे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीही फोडण्याचा प्रयत्न ते करतील याचा अंदाज होता. भाजपला एकहाती सत्ता येण्यापासून फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच रोखू शकते हे त्यांना माहिती असावे. त्यामुळे या पक्षांना फोडले तर आपण एकटेच राहू असे त्यांना वाटले असावे. पण ते हे विसरून गेले की लोकं आपल्याला निवडून देतात. या गोष्टी इतर ठिकाणी जमू शकतात, पण महाराष्ट्रात जमणार नाहीत, लोकं जमू देणार नाही, असा टोला रोहित पवारांनी लगावला. तसेच अजित पवार माझे काका आहेत. राजकारण बाजूला ठेऊन मी भावनिक झालो आहे. पण आता शरद पवार जी दिशा दाखवतील त्या दिशेने जाऊ, असेही ते म्हणाले.

सोडून गेले याची चिंता नाही, त्यांच्या राजकीय भविष्याची चिंता वाटते – शरद पवार