अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र ठरवा! राष्ट्रवादीची विधानसभा अध्यक्षांकडे याचिका

महाराष्ट्रात रविवारी पुन्हा एक राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार फुटले आणि थेट सत्ताधाऱ्यांना जाऊन मिळाले. यानंतर काहीच वेळात अजित पवार यांनी पाच वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची, तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह अन्य नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. याविरोधात आता राष्ट्रवादीने कायदेशीर पाऊल उचलले असून अजित पवारांसह शपथ घेणाऱ्या 9 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

सामना अग्रलेख – शिंद्यांची भाकरी करपली! नवी चूल, नवा तवा!!

अजित पवारांसह शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे इमेल आणि व्हाट्सएप मेसेजच्या माध्यमातून ही याचिका करण्यात आली आहे. अजित पवारांसह 9 जणांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना अंधारात ठेऊन पक्षाच्या धोरणाच्या आणि हिताच्या विरोधात जाऊन शपथ घेतली. त्यांची ही कृती बेकायदेशीर असून स्टेस्ट डेसिप्लिन कमिटीच्या सल्ल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल करण्यात आल्याची माहिती जयंत पाटील यांनी रविवारी उशिराने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना इमेलच्या माध्यमातून ही याचिका पाठवण्यात आले असून या कागदपत्रांची एक प्रत काही तासात त्यांना मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अपात्रतेच्या याचिकेवर लवकरात लवकर आमची बाजू ऐकून घ्यावी, यासाठी आम्ही राहुल नार्वेकर यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. ते लवकरात लवकर सुनावणी घेतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले. तसेच पक्षाने निवडणूक आयोगालाही याची कल्पना दिल्याचे त्यांनी सांगितले.

सोडून गेले याची चिंता नाही, त्यांच्या राजकीय भविष्याची चिंता वाटते – शरद पवार

जयंत पाटील पुढे म्हणाले की, नऊ आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात जाऊन आणि राष्ट्रीय अध्यक्षांना, प्रदेशाध्यक्षांना कल्पना न देता राजभवनात जाऊन शपथ घेतली. त्या क्षणापासून ते सर्व आमदार अपात्र ठरले आहेत. याबाबत आम्ही तातडीने पावले उचलली असून त्यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात कृती केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल करण्यात आली.

आम्हीच राष्ट्रवादी! अजित पवार यांचा पक्षावर दावा

महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते शरद पवारांसोबत आहेत. सर्व जिल्ह्यातील पक्षाचे अनेक पदाधिकारी समर्थनासाठी बाहेर आले आहेत. 9 आमदार म्हणजे पक्ष होऊ शकत नाही. त्यांनी जी शपथ घेतली आहे ती पक्षाच्या अध्यक्षांना न सांगता केलेली कृती आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर पावले उचलेल असे जाहीर केले होते, त्यानुसार पावले आम्ही उचलली आहेत. विधानसभा अध्यक्ष याबाबत आम्हाला लवकरात लवकर सुनावणीला बोलवतील अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.