सामना अग्रलेख – ब्लॅकमेलर लेकाचे!

दोन मुख्यमंत्र्यांच्या अटकेचा डाव व महाराष्ट्रातील धाडीवर धाडी हे ‘ब्लॅकमेलिंग’चेच सूत्र आहे. इंडिया आघाडी मजबुतीने पुढे जात असल्याचे हे चिन्ह आहे. केजरीवाल – सोरेन यांनी भाजपधार्जिणी भूमिका घेतली तर मोदीभक्त या दोघांची आरती गाऊ लागतील. राजन साळवी, रवींद्र वायकर हे रात्री ‘हुडी’ वेषात फडणवीसांना भेटायला गेले तर लगेच त्यांच्या शुद्धीकरणाचे होमहवन सुरू होतील. जनतेला हे कळत नाही, असे यांना वाटते काय?

जागतिक कीर्तीची ‘ब्लॅकमेलर’ पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी हे आता स्पष्ट झाले आहे. तथाकथित ‘खिचडी’ प्रकरणात शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांना ‘ईडी’ नामक भाजप संघटनेने अटक केली आहे. शिवसेनेचे कोकणातील आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने धाडी टाकल्या व गुन्हेही दाखल केले. शिवसेनेचे आणखी एक आमदार रवींद्र वायकर यांनाही ईडीचे बोलावणे आले आहे. तिकडे दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ‘ईडी’ने आतापर्यंत सहा समन्स पाठवून विशेष निमंत्रण दिले आहे. केजरीवाल हे दिल्लीसारख्या राजधानी राज्याचे लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. त्याच वेळी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही ‘ईडी’ची बोलावणी सुरू आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांनाही ईडीने कालच खास आमंत्रण देऊन बोलावले आहे. प. बंगाल, कर्नाटक, बिहारातील गैर भाजपशासित राज्यांत ‘ईडी’ने सत्ताधारी नेते व त्यांच्या कुटुंबियांचा छळ चालवला आहे. केजरीवाल यांनी सांगितले की, ‘ईडी’ने मला चौथी नोटीस पाठवली आहे. या सर्व नोटिसा बेकायदेशीर आहेत. राजकीय कटाचा भाग म्हणून या नोटिसा पाठवल्या जात आहेत. भाजप ईडी चालवत आहे. मला लोकसभा निवडणुकांआधी अटक करणे हेच ईडीचे उद्दिष्ट आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचेही तेच म्हणणे आहे. केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर जाऊ नये, ‘इंडिया आघाडी’तून बाहेर पडावे व अप्रत्यक्ष भाजपच्या विजयास हातभार लावावा, असा दबाव

केजरीवाल व सोरेन

या दोघांवर आहे. एका बाजूला भाजप एकवचनी, सत्यवचनी श्रीरामाच्या पूजाअर्चेत दंग आहे. घरोघर रामाच्या नावाने अक्षता पाठवून प्रचार सुरू आहे. मोदी हे रामाचे ‘पालक’ असल्यासारखे फिरत आहेत. ‘चारशे पार’चा नारा देत आहेत, पण त्यांच्या चेहऱयावर घाबरगुंडी स्पष्ट दिसत आहे. जिंकण्याचा इतका आत्मविश्वास असेल तर हे ‘ब्लॅकमेलिंग’ कशासाठी? रामाला प्रचारात उतरवूनही तुम्हाला हे असले दळभद्री प्रकार करावे लागत असतील तर तुमचा विजय खरा नाही. तो ‘ईव्हीएम’चाच घोटाळा आहे हे कबूल करावेच लागेल. महाराष्ट्रात सध्याचे सरकार ही ‘ईडी’ची निर्मिती आहे. आता त्याच ‘ईडी’चा वापर करून मोदी चमचा कंपनी महाराष्ट्रात ‘पॉवर’ दाखवत आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यातला 8000 कोटींचा ऍम्ब्युलन्स घोटाळा सामान्यजनांची झोप उडविणारा आहे. 800 कोटींच्या ऍम्ब्युलन्ससाठी 8000 कोटींची टेंडर्स जबरदस्तीने काढली जातात व कोणतीही तपास यंत्रणा त्यावर ब्र काढायला तयार नाही. हे आक्रितच म्हणावे लागेल. त्या 8000 कोटींचा हिशेब मागायला मुलुंडचे नागडे पोपटलाल तयार नाहीत. कारण त्या रुग्णवाहिका भ्रष्टाचाराचा मलिदा दिल्लीपर्यंत पोहोचला आहे व त्यामुळेच महाराष्ट्राच्या भ्रष्ट सरकारला अभयदान मिळत आहे. कोविड काळात लोकांना खिचडीचे वाटप झाले. लोक त्यामुळे उपासमारीने मरण पावले नाहीत, जे भाजपशासित इतर राज्यांत घडले. तो काळ टेंडरबाजी आणि इतर कागदपत्रांच्या पूर्ततेचा नव्हता, तर लोकांनी

फिल्डवर काम करण्याचा

व काम करून घेण्याचा होता. मेहनताना अनेक पटीने वाढवून अशावेळी कामे करून घ्यावी लागतात. यास घोटाळा म्हणणे हा त्या सर्व सेवकांचा अपमान ठरेल. कोविड काळात सर्वात मोठा घोटाळा कोठे झाला असेल तर तो ‘पंतप्रधान केअर फंडा’त. कोविडच्या नावाखाली जगभरातून हजारो कोटी रुपये गोळा केले. हा ट्रस्ट सरकारी असल्याचे दाखवून पैसा जमा केला. प्रत्यक्षात हा खासगी स्वरूपाचा ट्रस्ट असून पंतप्रधान कार्यालयाचा वापर उद्योगपतींकडून पैसे गोळा करण्यासाठी केला हे उघड झाले. पंतप्रधान केअर फंडाचा हिशेब काय? याची वारंवार विचारणा करूनही माहिती लपवली जाते. भाजपातील उधळलेल्या व माजलेल्या रेड्यांनी आधी पंतप्रधान केअर फंड व महाराष्ट्रातील 8,000 कोटींच्या ऍम्ब्युलन्स घोटाळ्याचा हिशोब द्यावा. मग दातांत अडकलेली खिचडीची शितं कोरत बसावीत. ‘ईडी’सारख्या संस्था भाजपच्या सुपारीबाज गुंड टोळ्यांप्रमाणे वागत आहेत, पण उद्या मालक बदलल्यावर याच टोळ्यांचे काय हाल होतील? श्रीराम व त्यांचे सध्याचे पालक त्यांना वाचवणार नाहीत. कारण मालकांनाच त्यांच्या लुटीचा व देशद्रोहाचा हिशेब द्यावा लागेल. दोन मुख्यमंत्र्यांच्या अटकेचा डाव व महाराष्ट्रातील धाडीवर धाडी हे ‘ब्लॅकमेलिंग’चेच सूत्र आहे. इंडिया आघाडी मजबुतीने पुढे जात असल्याचे हे चिन्ह आहे. केजरीवाल – सोरेन यांनी भाजपधार्जिणी भूमिका घेतली तर मोदीभक्त या दोघांची आरती गाऊ लागतील. राजन साळवी, रवींद्र वायकर हे रात्री ‘हुडी’ वेषात फडणवीसांना भेटायला गेले तर लगेच त्यांच्या शुद्धीकरणाचे होमहवन सुरू होतील. जनतेला हे कळत नाही, असे यांना वाटते काय?