सामना अग्रलेख – परिवर्तनाची गुढी उभारा!

गेल्या काही वर्षांत आलेल्या अघोषित हुकूमशाही राजवटीने देशातील लोकशाहीची गुढीच मोडून-तोडून टाकली. ‘महाशक्ती’नामक असुरी शक्ती वरवर रामराज्याचे नाव घेत प्रत्यक्षात मात्र रावण- राज्याचाच वरवंटा फिरवत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आता देशवासीयांनीच सजग राहून त्वेषाने व एकजुटीने या असुरी महाशक्तीचा निःपात करायला हवा. अघोषित हुकूमशाहीचा वरवंटा फोडून संविधान रक्षणाची, परिवर्तनाची व खऱ्याखुऱ्या लोकशाहीची गुढी उभारणारी विजयपताका आता फडकवावीच लागेल!

आज गुढीपाडवा. मराठी पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात गुढीपाडव्याला नवीन वर्ष सुरू होते. हिंदू धर्मात उत्सव आणि सणवारांची तशी भरपूर रेलचेल असली तरी गुढीपाडव्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. उत्साहाचे, चैतन्याचे, मांगल्याचे, विजयाचे आणि नवनिर्मितीचे प्रतीक म्हणून या सणाकडे पाहिले जाते. सालाबादच्या परंपरेनुसार आज घराघरांवर गुढय़ा उभारल्या जातील. बहुरंगी भरजरी वस्त्र परिधान करून सजवलेली वेळूची काठी, त्यावर साखरगाठीची माळ, कडुनिंबाची डहाळी, फुलांचा हार, त्यावर ठेवलेला मंगल कलश अशी मंगलमय गुढी आणि दारात रेखाटलेली सुबक रांगोळी असे प्रसन्न दृश्य आज गावखेडय़ांपासून महानगरांपर्यंत घरोघरी बघायला मिळेल. मराठमोळय़ा कुटुंबांमध्ये तर गुढीपाडव्याचे स्वागत अंमळ अधिकच हर्षोल्हासात केले जाते. गुढीपाडव्याचे महत्त्व केवळ मराठी माणसांपुरते वा हिंदू धर्मीयांपुरतेच मर्यादित आहे असे नाही. या सणाचा संबंध निसर्गाशी व सृष्टीच्या निर्मितीशी जोडलेला आहे. शिशिर ऋतूतील पानगळ संपून वसंत ऋतूचे आगमन होते ते गुढीपाडव्यालाच! वृक्षवल्लीवरील जुनी पाने झडून त्यांना नवीन पाने फुटू लागतात. रानावनांतील सारी वृक्षसंपदा बहरू लागते. फळांचा राजा असलेला आंब्याचा वृक्ष नव्या पालवीने फुलून जातो. पळस, गुलमोहोर, पांगारा, मोह, बोगनवेल यासारख्या वृक्षवेली

रंगीबेरंगी फुलांनी

नटू लागतात. एका अर्थाने जीवसृष्टीतील स्थित्यंतरे टिपणारा व समस्त चराचरातील मरगळ झटकून निसर्गाला व एकूणच सृष्टीला नवचेतना देणारा उत्सव म्हणजे गुढीपाडव्याचा सण. तसे पाहता गुढीपाडव्याकडे केवळ सण म्हणूनही पाहता येणार नाही. कारण ब्रह्मदेवाने समग्र विश्वाची, सृष्टीची, सप्तलोकांची निर्मिती केल्यानंतर ज्या दिवशी पहिल्यांदा सूर्य उगवला वा सूर्याची किरणे प्रथमच पृथ्वीवर पडली, तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. त्यामुळे एका अर्थाने संपूर्ण सृष्टीचा वाढदिवस म्हणून या सणाकडे पाहिले जाते. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा निःपात केल्यानंतर 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत ज्या दिवशी पाऊल ठेवले, तो मंगल दिवसही हाच. अयोध्येच्या प्रजेने प्रत्येक घरावर गुढ्या उभारून आपल्या लाडक्या राजाचे स्वागत केले व तेव्हापासून गुढी उभारण्याचा रिवाज सुरू झाला, असे सांगितले जाते. सृष्टीचा जन्मदिवस म्हणून नवनिर्मितीसाठी वा कुठल्याही नवीन संकल्पासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त हा सर्वोत्कृष्ट मानला जातो. नवीन घराची खरेदी, वाहन खरेदी, नवे पोषाख व नवीन उद्योग व्यवसायाची मुहूर्तमेढ वा शुभारंभासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त ठरवून निवडला जातो. त्यामुळे आज पाडव्याच्या निमित्ताने खरेदीसाठी

मोठीच झुंबड

पाहायला मिळेल. गुढीपाडवा हा ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनी’ असे म्हणत नावीन्याचा ध्यास घेत आनंदाची गुढी उभारणारा हा सण आहे. नवीन वर्षात हिंदुस्थानातील तमाम जनतेने समग्र देशवासीयांच्या आयुष्यात सुखाची गुढी उभारण्याचा संकल्प करायला हवा. गेल्या काही वर्षांत आलेल्या अघोषित हुकूमशाही राजवटीने देशातील लोकशाहीची गुढीच मोडून-तोडून टाकली. केवळ दोन-चार उद्योगपती मित्रांच्या घरांवर ऐश्वर्याची उधळण व त्यांच्याच बंगले-महालांवर सोन्याच्या गुढय़ा उभारल्या जात आहेत. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना व सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना कटकारस्थाने रचून तुरुंगात डांबले जात आहे. सरकारी यंत्रणांचा अमर्याद गैरवापर करून विरोधकांची राज्य सरकारे फोडली जात आहेत. भ्रष्टाचाऱयांना ब्लॅकमेल करून सरकारपक्षाकडे वळवले जात आहे. सत्ता व संपत्तीचा दर्प आणि त्या माध्यमातून बळावलेली ‘महाशक्ती’नामक असुरी शक्ती वरवर रामराज्याचे नाव घेत प्रत्यक्षात मात्र रावण- राज्याचाच वरवंटा फिरवत देशाच्या संविधानाची शकले करू पाहात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आता देशवासीयांनीच सजग राहून त्वेषाने व एकजुटीने या असुरी महाशक्तीचा निःपात करायला हवा. अघोषित हुकूमशाहीचा वरवंटा फोडून संविधान रक्षणाची, परिवर्तनाची व खऱ्याखुऱ्या लोकशाहीची गुढी उभारणारी विजयपताका आता फडकवावीच लागेल!