समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, दुभाजकावर कार धडकून दांपत्यासह मुलगा ठार

समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे खासगी बसचा अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी पुन्हा समृद्धी महामार्गावर कोपरगावात अपघात होऊन आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू झाला. महामार्गावर कार दुभाजकाला धडकून हा अपघात झाला.

मोहम्मद जावेद अख्तर (58), पत्नी शमीम बेगम मोहम्मद अख्तर (51), मुलगा अक्रमुद्दिन मोहम्मद अख्तर (22) अशी मृतांची नावे आहेत.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाच्या परिसरात आज सकाळी चालकाचा ताबा सुटून मोटार रस्त्याकडेला दुभाजकाला धडकली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महामार्गावरील मृतदेह बाहेर काढून वाहतूक सुरळीत केली.