सांगली संस्थान गणपती मंदिरासमोर कोयत्याने वार करून तरुणाचा खून

चोवीस तास गर्दीने गजबजलेल्या सांगली संस्थानच्या गणेश मंदिरासमोर थरारक पाठलाग करीत तरुणाचा कोयता, चाकूने भोसकून खून करण्यात आला. या खुनाच्या घटनेमुळे नागरिक आणि भाविकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण होऊन प्रचंड पळापळ झाली.

राहुल संजय साळुंखे (वय 19, रा. जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, सांगली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात साळुंखे याचा मित्र तेजस प्रकाश कारंडे (वय 21, रा. जामवाडी) याच्या डोक्यावर वार झाले असून, तो गंभीर जखमी आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून, त्यांच्या शोधासाठी तत्काळ पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

बुधवारी (दि. 10) रात्री नऊच्या सुमारास मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होती. पूर्वीच्या वादातून हा हल्ला झाला असावा, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

स्वामी समर्थ प्रकटदिनामुळे गणपती मंदिर परिसरात मोठी गर्दी होती. मागील बाजूला दर्शनानंतर गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होती. मयत राहुल साळुंखे आणि त्याचा मित्र तेजस कारंडे हे दोघे दुचाकीवरून गणपती मंदिराजवळ आले. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर त्यांनी दुचाकी लावली. त्यावेळी त्यांच्या पाळतीवर असणारे दोघेजण तेथे आले. दोघांनी पाठलाग करीत राहुलला गाठले. एका संशयिताने राहुल याच्या पोटात एकापाठोपाठ एक चाकू आणि कोयत्याने भोसकले. त्यावेळी त्याला वाचविण्यास आलेल्या तेजस कारंडेच्या डोक्यावरही हल्लेखोरांनी कोयत्याचा वार केला. जिवाच्या आकांताने राहुल हा मंदिरासमोर असणाऱया नारळविक्रेत्याच्या दुकानाच्या दिशेने पळत सुटला आणि तेथेच रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. प्रचंड रक्तस्त्र्ााव झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.