Lok Sabha Election 2024 : संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी, पक्षविरोधी वक्तव्यं भोवली

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सतत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या संजय निरुपम यांना काँग्रेस हायकमांडने पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. Sanjay Nirupam यांची काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी या कारवाईची घोषणा केली आहे.

काँग्रेस पक्षाकडून एक ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय सजिव के.सी. वेणुगोपाल यांच्या सहीचे एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. पक्षाची शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी संजय निरुपम यांना तातडीने 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यास मान्यता दिली आहे, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

गुरुवारी दुपारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय निरुपम यांच्यावरील कारवाईचे संकेत दिले होते. निलंबनाची कारवाई करण्यापूर्वी संजय निरुपम यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून हटवण्यात आले होते. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्तावही काँग्रेस हायकमांडकडे पाठवण्यात आला होता.

दरम्यान, संजय निरुपम यांनी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमोल किर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली. यावरून संजय निरुपम यांनी आपल्याच पक्षातील वरिष्ठांवर जोरदार टीका केली होती. काँग्रेस महाविकास आघाडीतील पक्षांसमोर झुकत असल्याची टीका त्यांनी केली होती.