रोखठोक – भवानी तलवार, बिचवा, वाघनखे, खंजीर; ‘खान’ कसा मारला?

छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार काही इंग्लंडवरून परत आली नाही. भवानी तलवारीचे राजकारणच अधिक झाले. आता महाराजांची वाघनखे आणावीत असे चालले आहे, पण अफझल खानाचा वध नक्की कोणत्या हत्याराने झाला? तलवार, खंजीर, बिचवा की वाघनखे? इतिहास संशोधकांचे वाघनखांवर एकमत नाही, हे मात्र नक्की!

त्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडन येथून आणण्याचे महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारने मनावर घेतले आहे. अफझल खानाच्या वधाच्या वेळी महाराजांनी ही वाघनखे वापरली असा दावा भाजपचे अंधभक्त इतिहासकार करीत आहेत, पण खऱ्या इतिहासकारांनी वाघनखांबाबतचा हा दावा फेटाळून लावला आहे. हा एक निवडणूक स्टंट आहे. 2014 साली महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारात छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद मोदींसोबत असल्याचे फलक मुंबईत लागले होते. यावेळी मोदींच्या हातात ‘वाघनखे’ दाखवून जाहिराती केल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार लंडनमधून आणावी यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. लोकमान्य टिळकांनी ही तलवार इंग्लंडमधून परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करणारी एक कविता गोविंदाग्रजांनी तेव्हा लिहिली. त्या कवितेपासून प्रेरणा घेत बॅ. अंतुले हे लंडनला भवानी तलवार आणण्यासाठी गेले व येताना फक्त तलवारीचे छायाचित्र घेऊन आले. आता विषय वाघनखांपर्यंत पोहोचला. लंडनच्या अल्बर्ट रॉयल म्युझियममध्ये शिवकालीन वाघनखे असून महाराष्ट्रात तीन वर्षांसाठी ही वाघनखे आणावीत, यासाठी राज्य सरकार सामंजस्य करार करत आहे. मुळात ही वाघनखे शिवकालीन आहेत की, खरोखरच अफझल खानाचा कोथळा काढण्यासाठी महाराजांनी वापरली ती हीच वाघनखे? यावर इतिहासकारांचे  एकमत नाही.

अफझल वधाचा इतिहास

इतिहास हा मराठी माणसाचा अत्यंत जिव्हाळय़ाचा विषय आहे. महाराष्ट्राला इतिहास आहे. इतर राज्यांना भूगोल आहे. छत्रपती शिवाजी महाराज येथे जन्माला आले म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. त्यामुळे शिवकालीन इतिहासाबाबत महाराष्ट्र संवेदनशील आहे. शिवाजी महाराजांनी केलेला अफझल खान वध हा महाराष्ट्राच्या इतिहासातील दिग्विजय मानला जातो. शिवाजी महाराज-अफझल खान भेटीची अनेक वर्णने अनेकांनी केली, पण इतिहासकार यदुनाथ सरकार, सेतु माधवराव पगडी यांच्या संशोधनास मी महत्त्व देतो. सेतु माधवराव पगडी सांगतात,

“प्रतापगड किल्ल्याच्या बाहेर एक शामियाना उभा करून तेथे शिवाजी महाराज व अफझल खान यांची भेट व्हावी असे ठरले. त्या दोघांनी आपल्याबरोबर दहा शरीरसंरक्षक घ्यावेत. ती माणसे भेटीच्या जागेपासून बाणाच्या टप्प्याच्या अंतरावर ठेवावीत असे ठरले. शिवाजी महाराज आणि अफझल खान हे शामियान्यात असताना सशस्त्र राहतील. त्यावेळी शामियान्यात त्यांच्याबरोबर दोन किंवा तीनहून अधिक सेवक राहणार नव्हते. या सेवकांत अफझल खानाचा वकील कृष्णाजी आणि महाराजांचा वकील पंताजी यांचा समावेश होता.

परमानंदाने आपल्या काव्यात शिवाजी महाराजांच्या शरीरसंरक्षकांची नावे दिली आहेत. त्यापैकी काही नावे म्हणजे संभाजी कावजी, काटोजी इंगळे, सिद्दी इब्राहीम आणि इतर होत. अफझल खानाच्या शरीरसंरक्षकांत रहीम खान, पहिलवान खान, शंकराजी मोहिते आणि इतर यांचा समावेश होता. वरील नावे पाहता लढय़ाचे राजकीय स्वरूप ठळकपणे जाणवते. परस्परविरोधी पक्ष मराठी आणि फारशी बखरीतून सुचवितात तसा हा लढा काही जातीय नव्हता. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील हा अत्यंत आणीबाणीचा प्रसंग होता. त्यांच्यावर जवळ जवळ असह्य वाटण्याइतका ताण पडला असला पाहिजे, पण त्यांचे आध्यात्मिक बळ प्रचंड होते. आपला धर्म आणि आपल्या परंपरा यांच्याविषयी त्यांची निष्ठा दृढ होती. आपल्या मातोश्री जिजाबाई यांचा आशीर्वाद ते नेहमी घेत असत. आपण आपल्या लोकांच्यासाठी झगडत आहोत, या लढय़ात आपल्याला परमेश्वराचे मार्गदर्शन होत आहे, अशी त्यांची अटळ श्रद्धा होती. महाराज हे खोल आध्यात्मिक प्रवृत्तीचे थोर पुरुष आहेत, अशी त्यांची प्रतिमा जनमानसात रुजली होती. यातूनच भवानी मातेने त्यांना दर्शन देऊन आशीर्वाद दिला अशा कथा रूढ झालेल्या दिसतात.

शिवाजी महाराज आणि अफझल खान यांची भेट सन 1659 च्या 10 नोव्हेंबर रोजी झाली. दोघेही शामियान्यात आले तेव्हा ते पूर्णपणे सशस्त्र होते. त्यांच्याबरोबर त्यांचे वकील होते. शिवाजी महाराजांपाशी एक पट्टीश तलवार (रुंद पात्याची), एक लांब खंजीर (कृपाण) ही शस्त्रे होती. कदाचित हातात लपवून ठेवलेली वाघनखेही असावीत. कवींद्र परमानंद हा वाघनखांचा उल्लेख करीत नाही. भीमसेन सक्सेनांसारख्या इतिहासकारांनी बिचवा (बाकदार कटय़ार) आणि वाघनखे यांची कदाचित गल्लत केली असावी. वास्तविक पाहता ही दोन्ही शस्त्रे भिन्न आहेत.

अफझल खानापाशी तलवार आणि खंजीरही होता. शिवाजी महाराजांना आपल्याबद्दल विश्वास वाटावा म्हणून अफझल खानाने आपली तलवार आपल्या नोकराच्या हातात दिली. शिवाजी महाराजांनी आपलीही तलवार आपल्या नोकराच्या हातात दिली किंवा कसे याबद्दल परमानंद काहीच सांगत नाही. इतर बखरीत मात्र महाराजांनी तलवार आपल्या नोकराला दिली असे म्हटले आहे, हे खरे दिसते.

परमानंदाच्या म्हणण्याप्रमाणे, महाराजांना अफझल खान भेटला त्यावेळी त्याने त्यांच्यापाशी पुढील मागण्या केल्या, “तुमची ही गर्विष्ठ आणि उद्धट वागणूक टाकून द्या आणि संपूर्ण शरणागती पत्करा.” अफझल खानाने महाराजांना पुढे म्हटले, “माझ्या हाताने मी तुम्हाला विजापूरला घेऊन जाईन, बादशहासमोर मुजरा करण्यास लावीन, आमच्या प्रबळ बादशहाला मी नम्रपणे विनंती करीन आणि तुमच्यासाठी याहूनही अधिक वैभव मिळवून देईन. तुम्ही गोंधळू-घाबरू नका. तुम्ही आपला हात माझ्या हातात द्या आणि मला आलिंगन द्या.”

शिवाजी महाराज अफझल खानाच्या मिठीत सापडले. त्यांना ठार मारण्याचा मोह अफझल खानाला अनावर झाला असावा. परमानंद म्हणतो, “असे म्हणून त्याने (अफझल खानाने) आपल्या डाव्या हाताने त्यांची मान धरली आणि दुसऱ्या हाताने महाराजांच्या कुशीवर कटय़ारीने वार केला. शिवाजी महाराज हे एक कसलेले मल्ल होते. त्यांनी तडाखून आपली मान सोडवून घेतली. आपली वृत्ती शांत ठेवली. कटय़ार त्यांच्या कुशीत शिरत होती, पण महाराजांनी आपले शरीर किंचित आकसून घेऊन तो प्रहार चुकविला. त्यानंतर त्यांनी आपला खंजीर अफझल खानाच्या पोटात खोलवर खुपसला. या आघातामुळे अफझल खानाचा झोक जाऊ लागला आणि तो अडखळत अडखळत चालू लागला. तो आपल्या अनुयायांना म्हणाला, “याने मला मारले, याला ठार मारा, शत्रूला ताबडतोब ठार मारा.”

शिवाजी महाराजांनी बैठकीच्या उंच जागेवरून खाली उडी घेतली, त्याच वेळी अफझल खानाच्या अनुयायांनी महाराजांवर तलवारीचा वार केला. परमानंदाच्या मते महाराजांनी अफझल खान आणि त्याचा अनुयायी या दोघांनाही ठार मारले. त्यांनी त्यांची शिरे उडविली.

परमानंदाने दिलेली ही हकीकत इतर मराठी बखरींहून भिन्न आहे. हल्ल्याच्या वेळी महाराजांच्या जवळ तलवार नव्हती. त्यांनी खंजीर आणि वाघनखे यांचा उपयोग केला. अफझल खानाला त्यांनी प्राणांतिक जखम केली. परमानंदावर विश्वास ठेवला तर असे म्हणावे लागेल की, महाराजांनी तलवारीचा शेवटचा वार केला आणि अफझल खानाचा शिरच्छेद केला. हे खरे नाही. अफझल खानाचा संपूर्ण निकाल लावणारे महाराजांचे सोबती होते. ते अफझल खानाच्या मागोमाग गेले आणि त्यांनी त्याला ठार मारले. शरीरसंरक्षक शामियान्यात घुसले. शामियान्यात मारामारी झाली. महाराजांवरही हल्ला झाला. त्यांनी मोठय़ा निर्धाराने स्वत:चे रक्षण केले. थोडय़ाच वेळात अफझल खानाचे सर्व शरीरसंरक्षक आणि त्याचा वकील हे जखमी तरी झाले अगर मारले गेले. महाराज किल्ल्यावर निघून गेले.

हत्यारांचा वाद

छत्रपतींनी अफझल खानाचा वध करताना खरेच वाघनखे वापरली का? यावर वाद आहेत. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत सांगतात, “शिवछत्रपतींनी अफझल खान वधाच्या वेळी जे वाघनख नावाचे शस्त्र वापरले ते शस्त्र कुठले आहे, कुठे आहे याविषयीची स्पष्टता 1919 पर्यंत होती. कारण ते शस्त्र सातारा छत्रपतींच्या शिलेखान्यात होते. त्याविषयीच्या नोंदी उपलब्ध आहेत, पण आता जी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधील वाघनखे तीन वर्षांसाठी सरकार इथे आणणार आहे, ती वाघनखे छत्रपतींनी अफझल खान वधाच्या वेळी वापरलेली वाघनखे नाहीत.”

“भवानी तलवार कशी होती, हे कुणालाच माहीत नाही. भवानी तलवारीचे प्रमाणभूत वर्णन आजही उपलब्ध नाही. परमानंदाच्या ‘शिवभारता’त आणि हरी कवीच्या ‘शंभूराज चरित्रा’त तिचा निर्देश आला असला तरी त्यात तिची लांबी, रुंदी, धार, मूठ, पाते, पोलाद, त्यावरील खुणा, चिन्हे, जडाव वगैरेंचे काम इत्यादी तपशील दिलेला नाही. शिवाय परंपरागत अशीही माहिती उपलब्ध नाही म्हणून आज एखाद्याने एखादी तलवार पुढे आणून ती ‘भवानी तलवार’ असल्याचे सांगितले तर त्याचे तोंड बंद करणे शक्य नाही. तरीही इतिहास हे पुराव्याचे शास्त्र असल्याने आणि असा पुरावा त्या व्यक्तीस देता येत नसल्याने तज्ञ व खरे इतिहासकार त्यांच्या शब्दास कधीच मान्यता देणार नाहीत,” असे थोर इतिहासकार ग. ह. खरे यांनी सांगून ठेवले आहे. खरे यांनी जे ‘भवानी तलवारी’बाबत सांगितले तेच वाघनखांबद्दल सांगावे लागेल.

त्या तलवारीचे काय?

शिवाजी महाराजांनी पुण्याच्या लाल महालात शाईस्तेखानाची बोटे छाटली. ज्या तलवारीने बोटे छाटली ती तलवारही तितकीच ऐतिहासिक. सन 1663 च्या 5 एप्रिलच्या रात्री शिवाजी महाराजांनी शाईस्तेखानाच्या छावणीवर साहसी हल्ला चढवला. तो यशस्वी झाला. शाईस्तेखानाच्या जिवावर बेतले होते, पण त्याची बोटे कापली गेली. त्याचा मुलगा अबुल फतह त्यात मारला गेला. या धाडसी हल्ल्याने सबंध देशावर छत्रपतींचा प्रभाव पडला. वाघनखांबरोबरच लंडनला गेलेल्या श्री. सुधीर मुनगुंटीवार यांनी ही ऐतिहासिक तलवारही शोधून भारतात आणायला हवी. महाराजांनी वाघनखे आणि तलवारीचे घाव घातले ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा गळा घोटणाऱ्यांवर. त्यांना दिल्लीची हुजरेगिरी करायची नव्हती. आज जे लोक ‘वाघनखे’ आणू पाहत आहेत त्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पायाशी गहाण ठेवला. त्यामुळे त्यांचा कोथळा काढण्यासाठी वाघनखांची गरज आहेच. त्यांची बोटे तर कधीच तुटली आहेत.

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]