खोट्या कारवायांसाठी सरसावलेल्या हातात उद्या बेड्या असतील, संजय राऊत यांचे संतप्त उद्गार

मुंबई पालिकेतील तथाकथित खिचडी घोटाळाप्रकरणी कारवाई करत ईडीने बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव सूरज चव्हाण यांना अटक केली. गुरुवारी शिवसेना उपनेते आणि आमदार राजन साळवी यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाडी टाकल्या. या कारवायांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. ‘लक्षात ठेवा दिवस बदलणार आहेत. आज खोट्या कारवायांसाठी हात सरसावले आहेत त्याच हातात बेड्या पडल्याशिवाय राहणार नाही.’ असा इशारा त्यांनी दिला.

खिचडीचे वाटप न करता मुंबई महानगरपालिकेकडून पैसे उकळणाऱ्या 38 कंपन्या आहेत. या कंपन्यांचे म्होरके मिंधे गट किंवा भाजपमध्ये गेले आहेत. ही मंडळीच सगळ्यात जास्त लाभार्थी असून त्यांना अटक का झाली नाही असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. 138 लोकांना खिचडी वाटपाचे काम दिले होते, किती लोकांच्या चौकशा झाल्या ते ईओडब्ल्यू आणि ईडीने समोर आणावे असे आव्हानच राऊत यांनी दिले आहे. 8 हजार कोटींचा अँम्ब्युलन्स घोटाळा, भीमा पाटस सहकारी कारखान्यात झालेले 500 कोटींचे मनी लॉण्ड्रींग, गिरणा सहकारी कारखान्यात झालेला 168 कोटींचा अपहार, तानाजी सावंत यांचे बदल्या, बढत्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण ही सगळी प्रकरणे तपास यंत्रणांना दिसत नाही का असा सवाल संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

राजन साळवी हे शिवसेना उपनेते आहेत आमदार आहेत, त्यांच्यावर दबाव येतोय. रवींद्र वायकरांवर असे दबावतंत्र सुरू आहे. लक्षात ठेवा दिवस बदलणार आहेत. आज खोट्या कारवायांसाठी हात सरसावले आहेत त्याच हातात बेड्या पडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.