खाऊगल्ली – टेस्टी पावभाजी

>> संजीव साबडे

पावभाजीची गंमत म्हणजे दिवसा ती पोटभरीचे अन्न असते, तर संध्याकाळी व रात्री कुटुंबासह ती खाणे ही चैन असते. ही भाजी खाण्यासाठी स्टॉलवर गर्दी असते, रेस्टॉरंटमध्येही तिची मागणी असते. अमेरिकेत झालेल्या नागरी युद्धामुळे जगात कापडाची टंचाई निर्माण झाली. त्यासाठी मुंबईतील गिरणी कामगार सलग 16 वा 24 तास काम करत. या कामगारांची जेवणाची व्यवस्था म्हणून मिक्स मसालेदार, तिखट भाजी आणि सोबत पाव दिले गेले. पुढे भाजीपाव सगळय़ांची आवडती पावभाजी बनली.

अनेकदा खाद्यपदार्थांचा इतिहास अतिशय मनोरंजक किंवा गमतीदार असतो. गेल्या काही वर्षांपासून तरुण व उच्चवर्गीय, फॅशनेबल मंडळींचा मॅकडोनाल्डचा बर्गर हा आवडीचा पदार्थ आहे. या मंडळींना वडापाव, इडली, डोसा, पोहे, उपमा हे प्रकार काहीसे खालच्या दर्जाचे वाटतात, पण हा अमेरिकेत गरीब व कामगार यांना आवडणारा व परवडणारा प्रकार होता. तसंच भाजीपावचं. पावभाजीची गंमत म्हणजे दिवसा ती पोटभरीचे अन्न असते, तर संध्याकाळी व रात्री कुटुंबासह ती खाणे ही चैन असते. विविध भाज्या उकडून व मसाले घालून केलेली ही भाजी खाण्यासाठी स्टॉलवर गर्दी असते, रेस्टॉरंटमध्येही तिची मागणी असते. या पावभाजीचा संबंध आहे 1961 ते 1965 या काळात अमेरिकेत झालेल्या नागरी युद्धाशी. त्या काळात जगात कापडाची टंचाई निर्माण झाली. मग काय, मुंबईतील गिरणी कामगारांना जोरात कामाला लावले. सलग 16 वा 24 तास काम. कामगारांची जेवणाची व्यवस्था म्हणून मिक्स मसालेदार, तिखट भाजी आणि सोबत पाव.

आज हाच भाजीपाव सर्वांच्या आवडीचा आणि पोटभरीचा प्रकार ठरला आहे. मुंबईत भाजीपाव म्हणताच आठवण येते ताडदेवच्या सरदारची आणि बोरिबंदर येथील माजी लष्करी अधिकारी अप्पा दांडेकर यांच्या कॅननची. त्यांच्याकडील भाजीपाव खाण्यासाठी जनरल माणेकशा एकदा सहकुटुंब आले होते. त्या वेळी त्यांना बसायला व प्लेट ठेवायला बाकडी टाकण्यात आली होती. आधी त्यांचा स्नॅक्स स्टॉल होता. एकदा ते मित्रांसह काळबादेवीला गेले. तिथे समोरासमोर दोन भाजीपाव गाडीवाले गिऱहाईकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत होते. नंतर कळलं की त्या दोघांचा मालक एक होता. तिथे होणारी गर्दी पाहूनच दांडेकर भाजीपावकडे वळले. त्यांच्या भाजीमध्ये काजू असतो. तव्यावर एका वेळी 90 प्लेट भाजी होते. कोथिंबीर पसरलेल्या भाजीसोबत प्लेटमध्ये भरपूर बटर लावलेले पाव, लाल पातळ चटणी, कांदा आणि सोबत लिंबाची फोड. कॅननला 50 वर्षे होतील.

ताडदेवचा सरदार भाजीपाव 1966 पासून सरदार अहमद यांनी छोटय़ा जागेत हा धंदा सुरू केला. आज तिथे गिऱहाईकांची प्रचंड गर्दी असते. तिथे साधी भाजी, बटर भाजी, भाजीवर चीज, ड्रायफ्रूट घातलेली भाजी, खडा भाजी, जैन भाजी, तिखट भाजी असे असंख्य प्रकार मिळतात. त्यांच्याकडील पाव इतके ताजे असतात की, बटर न लावताही ते मस्त लागतात. संध्याकाळनंतर तर तिथे अनेकदा वेटिंग असतं. गिरगाव चौपाटीवरील फेमस भाजीपावकडील भाजी छान व सौम्य असते, पण तिथे डोसा, पाणीपुरी असे सारेच प्रकार मिळतात. फक्त भाजीपाव हे त्यांचे वैशिष्टय़ नव्हे. चर्चगेट येथून क्रॉस मैदानातून जाणाऱया मार्गावर प्रसिद्ध खाऊगल्ली आहे. तेथील लेनिन पावभाजी सेंटर लोकप्रिय झाले आहे. साधी भाजी, चीज भाजी, खडा भाजी ही त्यांची वैशिष्टय़े. खाऊगल्ली म्हणताच घाटकोपर आठवते. तिथे भाजीत वेगळा काळा मसाला असतो.

टोमॅटो फार नसतो. त्यामुळे येथील काळी भाजीपाव एकदम पॉप्युलर झालाय. गिरगावात चर्चजवळ मराठी माणसाचे ‘मनोहर’ हे रेस्टॉरंट फक्त पावभाजीचे. भाजीसाठी खास तयार केला जाणारा झणझणीत लाल मसाला म्हणजे पोटात जाळच. रुईया कॉलेजच्या समोरच डीपी अनेक खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. रुईया, पोदार कॉलेज आणि वेलिंगकर इन्स्टिटय़ूटमधील कॉलेजची पोरं-पोरी, शिक्षक तसेच त्या भागात कामासाठी जाणारे हमखास तिथे दिसतात. तिथली पावभाजी खाल्ली की मग चार-पाच तास खाण्याचा विचारही डोक्यात येत नाही. शिवाजी पार्कच्या जिप्सी कॉर्नरमधील भाजीही मस्त व सौम्य, पण सोबत ठेचा मागितला तर मात्र धडगत नाही. अनेक मराठी कलाकारांचा जिप्सी व आसपास हा भेटण्याचा अड्डाच आहे. सायनच्या गुरुनानक हायस्कूलपाशी पुजारी भाजीपाव आहे. त्याची ब्राऊन खडा भाजी लोकांना आवडते. काही जण तर तिथे फक्त मसाला पाव खातात. पाणीपुरी खाल्ल्यानंतर काही जण सुकी पुरी मागतात, तसं इथे काही जण मसाला पाव मागतात. जुहू चौपाटीवर सिद्धिविनायक फास्ट फूडची भाजी चांगली आहे, पण त्याच्याकडे फार व्हरायटी नाही.

इर्ल्याच्या कूपर रुग्णालयाबाहेर अमर ज्यूस सेंटर आहे. तिथे भाजीपाव खायला, ज्यूस प्यायला संध्याकाळी व रात्री कारमधून इतके लोक येतात की वाहतूक कोंडी होते. हे सेंटर फूटपाथवर आहे. तिथेच बाजूला चटया टाकलेल्या असतात. तिथेच मांडी ठोकून लोक भाजीपाववर हात मारतात. तिथला चीज भाजीपाव खूप जण खातात. खूपच बटर, चीज व पनीर घातला की खरे तर भाजीची चव मरून जाते. हे दोन्ही प्रकार निष्कारणच समृद्धी व मोठेपणाची लक्षणं बनवली गेली आहेत. विलेपार्ले पश्चिमेला असलेल्या मारुती भाजीपावकडे कायम कॉलेज विद्यार्थ्यांची गर्दी असते. मशरूम, चीज, पनीर घातलेली भाजी तशी सौम्यच लागते. तेथील भाजी खमंग, चटपटीत, पण झणझणीत नाही. बोरिवलीच्या मां अंजनी भाजीपाव सेंटरची भाजी इतकी लाल भडक की पाहूनच भीती वाटते, पण ती तिखट नाही. त्यांच्या मसाल्याची चव काहीशी वेगळी आहे. घाटकोपरला साईकृपा भाजीपाव सेंटर आहे. तेथील भाजी भडक नाही, सहज पचेल अशी. पोटात आग अजिबात नाही.

मुलुंड पश्चिमेला, बहुधा लालवानी रोडवरील मुकेश भाजीपाव प्रसिद्ध आहे. मात्र भाजी बनवताना आणि ती प्लेटमध्ये घातल्यानंतर वरून बचकभर बटर घातल्याने भाजी तुपात तरंगू लागते. आपण बटर नव्हे, तर भाजीपाव खाण्यासाठी आलो आहोत याची इथेच नाही तर अनेक स्टॉलवर आठवण करून द्यावी लागते. याखेरीज मुंबईत, ठाण्यात चांगली भाजीपाव खायला घालणारे खूप आहेत. प्रत्येक जण वेगवेगळे मसाले बनवतात, पण बऱयाच ठिकाणी भाजीच्या चवीत साधर्म्य जाणवतं. जिथे चवीमध्ये वेगळेपणा जाणवतो, ते ठिकाण मस्त. अन्यथा वेगवेगळय़ा ठिकाणी जाण्याला काय अर्थ आहे? काही ठिकाणी भाजीवर नायलॉन शेव पसरून देतात. तेव्हा भेळ खायला आलोय की काय अशी शंका येते.

[email protected]