सातारा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर; पण महायुतीतील पेच कायम!

अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील लढतीत अखेर महाविकास आघाडीने आज आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे निदान महाविकास आघाडीचे कोण, या प्रश्नाचे उत्तर मतदारांना मिळाले आहे. मात्र, खासदार उदयनराजे यांच्याबाबतचा निर्णय अधांतरीच ठेवल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराबाबतचा संभ्रम आजही कायम आहे.

महायुतीकडून भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून तयारी करीत आहेत. परंतु, भाजपने त्यांना उमेदवारीबाबत कसलेही संकेत दिले नाहीत. एका बाजूला अजित पवार गट व मिंधे गट यांनीही सातारच्या जागेवर दावा सांगितल्यामुळे महायुतीत तणावाची परिस्थिती आहे. तरीही भाजपचा या जागेवर डोळा असल्यामुळे महायुतीत गोंधळ आहे.

अशा स्थितीत काही झाले तरी निवडणूक लढवणार असल्याचे उदयनराजे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे भाजपच्या राज्यातील नेत्यांची धावाधाव सुरू होती. त्यांच्याकडून गोड बोलून, काहीही करून उदयनराजे यांना थोपवण्याचे प्रयत्न सुरू असताना उदयनराजे दिल्ली दरबारी गेले. तेथे अमित शहांनी त्यांना काय शब्द दिला माहिती नाही; पण त्यानंतर सातारला आल्यावर उमेदवारी फिक्स असल्याचे गृहीत धरून त्यांचे जंगी स्वागत झाले. मात्र, भाजपच्या उमेदवारांच्या याद्यांवर याद्या येत असताना अजूनही उदयनराजे यांचे नाव यादीत न आल्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण, हा संभ्रम कायम आहे. त्याच वेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने आज जाहीर केलेल्या तिसऱया यादीत साताऱयातून आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव जाहीर झाल्यामुळे महाविकास आघाडीचे कोण, या प्रश्नाचे उत्तर मतदारांना मिळाले आहे.

महायुतीत अद्याप ही जागा कोणाला द्यायची, की आपल्याकडेच ठेवायची? इथेच घोडे अडलेले दिसते. एकीकडे उदयनराजे यांनी मतदार गाठीभेटीचा सपाटा लावला असताना महायुतीकडून उमेदवाराचे नाव जाहीर होत नसल्यामुळे पेच कायम आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत प्रतिकूल निष्कर्ष आल्याचे तसेच उदयनराजे यांची राज्यसभेची मुदत जवळपास तीन वर्षांहून अधिक असल्याने भाजप नव्या चेहऱयाच्या शोधात असल्याची चर्चा आहे. एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर महायुतीतील सातारचा तिढा कायम आहे.