मांजराची खवले विक्रीसाठी घेऊन येणारा पोलीसांच्या जाळयात

खवले मांजराची खवले घेऊन विक्रीसाठी निघालेल्या एकाला दापोली पोलीसांनी छापा टाकून पकडले. त्याच्याकडून 11 किलो 678 ग्रॅम वजनाची खवले मांजराची खवले जप्त करत त्याला अटक करण्यात आली.

सोंडेघर ते मंडणगड या रस्त्यावर शिरखल आदिवासी वाडी येथे एक व्यक्ती खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीसांना कळली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखा रत्नागिरी येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक भरत पाटील आणि पथकाने वनविभागाशी संपर्क साधून दापोली वनविभाग येथील वनरक्षक गणपती जळणे याला सोबत घेऊन छापा टाकला. बाळा गणपत लोंढे, वय 82, रा. कोटींवाडी, पालगड, दापोली हा सोंडेघर ते मंडणगड जाणाऱ्या रस्त्यावर शिरखल आदिवासी फाटा येथे वन्यजीवी खवले मांजराची खवले घेऊन विक्रीसाठी निघाला होता. पोलीसांनी त्याच्याकडील 11 किलो 678 ग्रॅमची खवले मांजराची खवले जप्त केली. त्याच्यावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरिक्षक भरत पाटील, पोलीस हवालदार राजेश भुजबळराव, पोलीस हवालदार उदय चांदणे, लक्ष्मण कोकरे, महेश गुरव, आशिष शेलार, प्रशांत बोरकर, ओंकार सावंत आणि वनरक्षक गणपती जळणे यांनी केली.