मिथक शिल्पांचे देखणेपण

आशुतोष बापट / वारसा वैभव

प्राणी वा पक्ष्यांचे एकत्रीकरण किंवा त्यांचे संमिश्र रूप म्हणजे एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया प्राण्याचे शरीर अशी संयुक्त रचना करून तयार केलेली शिल्पे आपल्याला प्राचीन काळापासून हिंदुस्थानी कलेत दिसून येतात. या व्यालप्रतिमा म्हणजेच मिथकशिल्पांचे देखणेपण उठून दिसते.

शंकराच्या मंदिरात गेल्यावर गाभाऱयाच्या उंबरठय़ावर एक राक्षसाचे तोंड कोरलेले दिसते. कार्ल्याच्या लेणीत गेल्यावर तिथल्या खांबांवर कुणी चमत्कारिक प्राणी दिसतात. राशीपा बघताना धनु राशीचे चिन्ह दाखवताना अर्धा घोडा आणि अर्धा माणूस दाखवतात. काही काही देवळांवर चांगले तीन फूट उंचीचे प्राणी दिसतात. त्यांचे तोंड हत्तीचे असते आणि उरलेला देह सिंहाचा असतो. हंपीला गेल्यावर तिथल्या विठ्ठल मंदिराच्या खांबावर एक निराळाच प्राणी दिसतो. वेगवेगळ्या प्राण्यांचे अवयव एकत्र करून घडवलेला हा प्राणी असतो. त्याचं नाव काही सांगता येत नाही. त्याचं नक्की रूप काय आहे हेदेखील समजत नाही. काय असतं हे सगळं? कशासाठी अशी रचना केलेली असते? या प्राण्यांची काही कथा आहे का? असे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात आणि त्याची समाधानकारक उत्तरे काही मिळत नाहीत.

या सगळ्या प्राण्यांना मिथक प्राणी, पौराणिक प्राणी किंवा काल्पनिक प्राणी असे म्हणतात. या सगळ्याचा एक सोपा शब्द नंतर समोर येतो तो म्हणजे ‘व्यालशिल्पे’. यांना व्याल असे संबोधले जाते. प्राणी वा पक्ष्यांचे एकत्रीकरण किंवा त्यांचे संमिश्र रूप म्हणजे एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया प्राण्याचे शरीर अशी संयुक्त रचना करून तयार केलेली शिल्पे आपल्याला प्राचीन काळापासून हिंदुस्थानी कलेत दिसून येतात. या प्रकाराला ‘व्याल’ असा शब्द जरी सध्या रूढ झालेला असला तरी हा शब्द साधारण इ.स.च्या 6 व्या शतकानंतर वापरला जाऊ लागला. संयुक्त प्राणी ज्याला इंग्रजीत ‘मिथीकल अॅनिमल‘ असं म्हटलं गेलं आहे, त्याला आपण पौराणिक किंवा खरं तर काल्पनिक प्राणी म्हणू शकतो. हे असे प्राणी कलेत दाखवणे ही कलाकाराच्या कल्पनाशक्तीची भरारी म्हणावी लागेल. कलाकारांच्या या कल्पनाशक्तीला जोड मिळाली आहे ती या प्राण्यांच्या साहित्यातून येणाऱया वर्णनांची आणि त्याचबरोबर परकीय कलेच्या प्रभावाची. हिंदुस्थानी कलेमध्ये अशा संयुक्त प्राण्यांच्या वापराचे संदर्भ आपल्याला प्राचीन साहित्यांतूनही मिळतात. साहित्यात अशा प्राण्यांना ‘इहामृग’ असे म्हटले गेले आहे.

प्राचीन हिंदुस्थानी साहित्यात विविध ग्रंथांसोबतच मत्स्य, लिंग, हरिवंश, वायू, ब्रह्म, वामन या पुराण ग्रंथांमधूनही विविध ठिकाणी इहामृगाचा उल्लेख आलेला आहे. किंबहुना पौराणिक लेखकांनी या इहामृगांची एक यादीच दिलेली आहे. गजानन, ह्यानन, सिंहानन, व्याघ्रानन, मृगेंद्रवदन, खरमुख, मकरानन, इहामृगमुख, काकमुख, गृद्धमुख अशी अनेक नावे या यादीत दिसून येतात. कालिदासाचे प्रसिद्ध नाटक ‘रघुवंश’ यातही अर्धा हत्ती-अर्धा मत्स्य अशा एका दैत्याचा उल्लेख येतो.

इ.स.पूर्व दुसऱया शतकापासून लयनस्थापत्य महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. चैत्यगृह आणि विहार असे लेण्यांचे स्वरूप असते. लेणीचा दर्शनी भाग (फसाड) आकर्षकरीत्या कोरलेला दिसतो. लेण्यांमध्ये असलेल्या स्तंभांवर आपल्याला प्राणी कोरलेले दिसून येतात. बेडसे आणि कार्ले तसेच लेण्याद्री इथे या प्राण्यांच्या पाठीवर कुणी एकटा स्वार तर कधी दंपती बसलेली दाखवतात. मात्र या लेण्यांमधून खूप सुंदर असे संमिश्र प्राणी कोरलेले दिसून येतात. पितळखोरा, भाजे, जुन्नर, लेण्याद्री, नाशिकची पांडवलेणी या लेण्यांतून स्फिंक्स, सेंटॉर, किन्नर कोरलेले आहेत. म्हणजे नुसते सांची, अमरावती, मथुरा इथल्या कलेतच नाहीत तर या लेण्यांतूनही या पौराणिक प्राण्यांचे दर्शन कलाकारांनी आपल्याला करून दिले आहे. यात पंख असलेला सिंह, चोच असलेला सिंह, माणसाचा चेहरा असलेला सिंह, पंख असलेले घोडे, हत्ती अशी विविधता दिसते. नाग व गरुडाचे मानवीकरण केलेली शिल्पे कोरलेली आहेत.

संमिश्र प्राणी किंवा संमिश्र पक्षी यांचे कलेतील सादरीकरण आपण सांची, भारहूत, अमरावती, नागार्जुनकोंडा इथे तसेच अजिंठा इथल्या लेणींमधील चित्रकलेत बघितले. ‘इहामृग’ अर्थात संमिश्र प्राण्यांची संकल्पना पुढे ‘व्याल’ या संकल्पनेत परावर्तित झालेली दिसून येते आणि इ.स.च्या 6 व्या शतकानंतर बांधलेल्या अनेक मंदिरांवर हे व्याल किंवा असे संमिश्र प्राणी मोठय़ा प्रमाणावर कोरलेले दिसून येतात. हे व्याल कोरताना भिन्न प्राण्यांची शरीरे एकत्र करून हे काल्पनिक प्राणी कोरले गेले आहेत. एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया एका किंवा एकापेक्षा जास्त प्राण्यांच्या शरीराचे भाग एकत्र करून असे व्याल कोरले गेले. ज्या प्राण्याचे तोंड कोरलेले असेल त्याच्या नावाने तो व्याल ओळखला जातो. उदाहरणार्थ, हत्तीचे तोंड आणि शरीर सिंहाचे असे शिल्प असेल तर त्याला ‘गजव्याल’ असे म्हटले जाते. मग मकरव्याल, अश्वव्याल, अजव्याल, गणेशव्याल अशा असंख्य व्याल प्रतिमा मंदिरांवर कोरलेल्या दिसून येतात. खजुराहो इथल्या मंदिरांवर असे व्याल दिसून येतात. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर गडचिरोली जिह्यातल्या मार्कंडा मंदिरावर खूप मोठय़ा संख्येने व्याल कोरलेले आहेत. तारकाकृती आकारामुळे मंदिराच्या बाह्य भिंतीना अनेक कोन निर्माण होतात. उठाव असलेल्या भिंतींवर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात, तर त्या दोन मूर्तींच्या आतमध्ये असलेल्या कोनांवर व्याल प्रतिमा कोरलेल्या असतात. या व्याल प्रतिमांचे देखणेपण आणि त्यांचा ठसठशीतपणा प्रकर्षाने उठून दिसतो.

छत्तीसगडच्या पाली इथल्या मंदिरावर नरव्यालाची मूर्ती आहे. चेहरा माणसाचा आणि उर्वरित शरीर प्राण्याचे असा हा नरव्याल इथले मुख्य आकर्षण म्हणायला हवा. इथले व्यालसुद्धा हत्तीच्या पाठीवर दाखवलेले आहेत. याचा अर्थ हत्ती आणि या व्याल प्रतिमा यांचा काहीतरी संबंध असण्याची दाट शक्यता दिसते. या मंदिरावरचे व्याल फारच देखणे आहेत आणि देवतांना जसे विविध दागदागिने दाखवतात तसे विविध दागिने या व्यालांच्या अंगावर कोरलेले दिसतात. इतकी सुंदर शिल्पकला अर्थातच चकित करून टाकते. तत्कालीन कलाकारांची कलासक्त नजर आणि कुठलीही गोष्ट सादर करताना ती अतिशय मोहक रूपात सादर केली पाहिजे ही ओढ प्रकर्षाने जाणवते.

> [email protected]