Lok Sabha Election 2024 – माढातून निवडणूक लढवणार का? शरद पवारांनी दिले उत्तर

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. दोन तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निषेध केला. शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेत यावर आपली सविस्तर भूमिका मांडली. तसेच राज्याच्या राजकारणावरही त्यांनी भाष्य केले.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने राज्यातील 7 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. काँग्रेसने पुण्यातून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे माढा मतदारसंघातून स्वत: शरद पवार रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र या सर्व चर्चांना शरद पवार यांनी पूर्णविराम दिला असून यापुढे कधीच निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माढ्याची जागा महादेव जानकर यांनी लढावी, ही माझी वैयक्तीक मागणी आहे. मात्र सगळ्यांनी ऐकली पाहिजे. ज्योती मेटे यांच्यासंदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही. आमच्याकडे आणखी लोकं येतील, महायुतीची जागा निश्चित झाल्यावर आणखी माणसं येतील. राज ठाकरे यांच्या पक्ष एक ते दोन जागा लढवणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे काही फरक पडणार नाही असेही शरद पवार म्हणाले.

निवडणूक रोख्यांचा घोटाळा भाजपवर शेकलाय, लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवालांना अटक! – संजय राऊत

ते पुढे म्हणाले की, आतापर्यंत देशात काही अपवाद सोडले तर निवडणुका या अतिशय मोकळ्या वातावरणात झाल्या आहेत. मात्र यावेळेसची निवडणूक कशी होईल याची शंका आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सध्या सुरु आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसची बँक खाती गोठवल्याने त्यांची प्रचार यंत्रणा थांबली आहे.

ईडी, सीबीआयचा वापर करणे, निवडणुकीच्या काळात दहशतीचं वातावरण निर्माण करणं या सर्व गोष्टींचा मी निषेध करतो, आणीबाणीच्या काळात जे झालं नाही ते आता होत आहे. केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागणार आहे. केजरीवाल हे दिल्लीत बसून मोदींच्या भूमिकेला विरोध करतात. त्यामुळेच त्यांच्याविरोधात ही अटकेची कारवाई करण्यात आली, असा आरोपही पवारांनी केला.