निवडणूक रोख्यांचा घोटाळा भाजपवर शेकलाय, लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवालांना अटक! – संजय राऊत

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची अटक पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. त्यांना राजकीय सूडबुद्धीने अटक करण्यात आली आहे. निवडणूक रोख्यांचा घोटाळा भारतीय जनता पक्षावर शेकलेला आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.

शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. एकेकाळी मोदी आणि भारतीय जनता पक्ष केजरीवाल यांच्यासोबत भ्रष्टाचाराविरोधात लढत होता. पण भाजपनेच गुन्हेगारांकडून हजारो कोटी रुपये खंडणी, हप्तावसुली आणि दहशतीच्या माध्यमातून वसूल केले आहेत. ते स्वत:ला हिंदुत्ववादी समजतात. गोवंश हत्याबंदीसाठी आंदोलन मोठे आंदोलन झाले, मॉब लिचिंग केले. पण जिथे गायींची कत्तल होते आणि जिथून बिफची निर्यात होते त्यांच्याकडूनही भाजपने पैसे घेतले आहेत. हेच भाजपचे हिंदुत्व आहे. भाजप लोकांचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांच्या खात्यात याच लोकांकडून पैसे गेले आहेत, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, कथित मद्य घोटाळ्यात केजरीवाल यांच्याआधी मनिष सिसोदिया, संजय सिंह आणि बीआरएस नेत्या कविता यांना अटक झाली. याच घोटाळ्यातील प्रमुख ठेकेदारांनी भाजपला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून निधी दिलाय का? याचे स्पष्टीकरण त्यांनी समोर येऊन द्यावे. कारण ‘प्रोसिड ऑफ क्राईम’चा पैसा पीएमएलए कायद्यानुसार तुमच्या खात्यात गेला असेल तर सर्वात आधी मनी लाँड्रिंगचा खटला भाजपच्या अध्यक्षांवर व्हायला हवा.

निवडणूक रोख्यांच्या घोटाळ्यावरून देशभरात जो धुराला उडतोय त्याच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवाल यांना अटक करण्यात आली. लोकांनी निवडून दिलेल्या, पूर्ण बहुमत असलेल्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. हेमंत सोरेन यांनाही अटक करण्यात आली. विद्यमान मंत्र्यांनाही अटक करता, पण देशात आणि महाराष्ट्रात सर्वात भ्रष्ट सरकार तुमचे आहे. ज्यांना अटक करता त्यांना तुम्ही मंत्री, उपमुख्यमंत्री करतात. जे तुरुंगात असायला हवेत, जामिनावर सुटले आहेत त्यांना केंद्रात आणि महाराष्ट्रात मंत्री करता आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करता यालाच हुकुमशाही म्हणतात, आणि याच हुकुमशाहीविरोधात आम्ही लढतोय, असेही राऊत म्हणाले.

लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न, भाजपला किंमत मोजावी लागणार; केजरीवालांच्या अटकेवर पवारांची प्रतिक्रिया

उद्या ते कोणालाही अटक करू शकतात. मोदी-शहा यांना ज्यांच्यापासून पराभूत होण्याची भीती वाटतेय त्या सगळ्यांना ते अटक करू शकतात. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांना लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, लाल-बाल-पाल, वीर सावरकर यांची भीती वाटायची आणि म्हणून ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात टाकले किंवा फासावर लटकवले. मोदींचे सरकार त्याच पद्धतीने चालले आहे. सरकारला निवडणूक हरण्याची, लोकांचा उठाव होण्याची भीती वाटतेय. त्यामुळे ते सगळ्या नेत्यांना तुरुंगात टाकू इच्छितात, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

कारवाईपासून वाचायचं असेल तर आमच्यासोबत या, हेच भाजपचे धोरण आहे. देशात कायद्याचे राज्य नसून वाशिंग मशिनचे राज्य आहे. आमच्यावरही दबाव होता आणि आहे. पण आम्ही झुकणार नाही, असेही संजय राऊत यांनी ठणकावले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)