नरेंद्र मोदी देशाचे नव्हे फक्त भाजपचे पंतप्रधान! शरद पवार यांचा हल्लाबोल

देशाची परिस्थिती सध्या बिकट असून, लोकशाही संपवून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू झाली आहे. पंतप्रधान हा कोण्या एका पक्षाचा नसतो, त्याने देशाचा विचार करायला हवा. पण, नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून असे वाटत नाही. नरेंद्र मोदी हे देशाचे नव्हे तर फक्त भाजपचे पंतप्रधान आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

छत्रपती संभाजीनगर आणि जालना लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत खैरे आणि डॉ. कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च पद आहे. त्या पदावरील व्यक्तीने राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवला पाहिजे. परंतु, नरेंद्र मोदी यांना याचे विस्मरण झालेले दिसते. मोदी फक्त विरोधकांवर टीका करतात. त्यापेक्षा तुम्ही काय काम केले, पुढे काय करणार हे देशाला सांगितले पाहिजे. परंतु, ते सांगत नाहीत. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी मोदींनी काय केले? दुष्काळाचे संकट मोठे आहे, त्यातून शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्या काय उपाययोजना आहेत? पण, या प्रश्नांचे उत्तर मोदींकडे नाही. मोदींचे सरकार सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला.

महाविकास आघाडीला चांगले यश मिळणार
भाजपने केलेला चारशेपारचा दावा चुकीचा असल्याचे शरद पवार म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीला पोषक वातावरण असून, आम्ही ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा विश्वासही यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला. मोदी सरकारच्या काळात नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा येत असून, दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

याप्रसंगी व्यासपीठावर चंद्रकांत खैरे, डॉ. कल्याण काळे यांच्यासह एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे, आमदार उदयसिंह राजपूत, माजी मंत्री अनिल पटेल, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेनेचे महानगरप्रमुख राजू वैद्य, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, शहरप्रमुख बाळसाहेब थोरात, माजी आमदार केशवराव औताडे, प्रा. किशोर पाटील, नामदेव पवार, विजयअण्णा बोराडे, ख्खाजा शरफोद्दीन, विश्वजित चव्हाण, सुधाकर सोनवणे, रंगनाथ काळे, मोतीलाल जगताप, काँग्रेसचे मुश्ताक अहेमद, सूर्यकांता गाडे, वीणा खरे, राजेश पवार, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा दीक्षा पवार, दीपाली मिसाळ, मेहराज पटेल, छाया जंगले, नवनितसिंग ओबेरॉय आदी उपस्थित होते.