शिखर बँक घोटाळ्याचा क्लोजर रिपोर्ट हा भ्रष्टाचारच – संजय राऊत

पंतप्रधान मोदी यांनी भाष्य करावे

शिखर बँक घोटाळ्याचा क्लोजर रिपोर्ट हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार असून, तो सत्ताधारी भाजपा करीत आहे, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच भाष्य करावे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

नाशिक येथे बुधवारी सायंकाळी खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोलिसांनी दुसऱयांदा क्लोजर रिपोर्ट दिला, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भाजपाचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अजिबात भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, जनतेचे, देशाचे पैसे लुटणाऱयांना तुरुंगात टाकू, असा इशारा दिला होता. त्यांनीच शिखर बँक, सिंचन घोटाळा चव्हाटय़ावर आणला. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनीच या क्लोजर रिपोर्टवर भाष्य करावे. भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यावरच असे रिपोर्ट उपलब्ध का होतात, इतरांच्या नशिबी ते का नाही, यावर महाराष्ट्रामध्ये चिंतन आणि मंथन करण्याची वेळ आली आहे. सत्ताधारी भाजपाच या स्वरुपाचे देशातील सर्वात मोठे भ्रष्टाचार करीत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजपाशी संधान बांधले नाही, स्वाभिमानाने ते परिस्थितीला सामोरे जात आहेत, यामुळेच त्यांच्यावर सूडानं कारवाई सुरू आहे. ही देशातील लोकशाहीची दुर्दशा आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदारांना निधी न देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या, असा आरोप आमदार अजय चौधरी यांनी केला आहे, या प्रश्नावर खासदार संजय राऊत म्हणाले की, हे खरं आहे. आधी खोक्यांच्या रूपाने आणि आता निधीच्या रूपाने महाराष्ट्राच्या तिजोरीची लूट मिंधे करीत आहेत.

यावेळी उपनेते सुनील बागुल, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर वसंत गीते, विनायक पांडे, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, प्रशांत दिवे, देवानंद बिरारी, बाळासाहेब कोकणे, राहुल ताजनपुरे, राहुल दराडे, सुनील जाधव, वीरेंद्र टिळे आदी उपस्थित होते.