बेशिस्त वाहनचालकांवर शिरूर पोलिसांची कारवाई, नियम तोडणाऱ्यांकडून 35 हजार रुपयांचा दंड वसूल

शिरूर पोलीस ठाण्यात नव्यानेच दाखल झालेले पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी शिरूर मध्ये वाहतूक सुरळीत रहावी व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे म्हणून शिरूर शहरामध्ये मध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 24 वाहन चालकांवर कडक कारवाई केली असून त्यांच्याकडून सुमारे 35 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली. पोलीस निरीक्षक संजय जगताप, शिरूर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.

शिरूर शहरातील बस स्थानक परिसर, बी. जे. कॉर्नर, सी टी बोरा कॉलेज रोड, निर्माण प्लाझा व परिसरात ही करण्यात आली. या कारवाईसाठी पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, सहायक फौजदार अनिल चव्हाण, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, विरेंद्र सुंबे, अर्जुन भालसिंग, महिला अंमलदार भाग्यश्री जाधव व चार होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली होती. या कारवाई दरम्यान दुचाकीवर ट्रिपल सीट, विना लायसन गाडी चालविणे, विना नंबर प्लेट, चारचाकी गाडीला ब्लॅक फिल्म असणाऱ्या गाड्या यांच्यावर करण्यात आली आहे.

यापुढे ही शिरूर पोलिसांच्या वतीने अशा प्रकारच्या कारवाया नियमितपणे केल्या जाणार असून वाहन मालक,चालकांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी केले आहे.