महाराष्ट्राचा आणि मराठीचा असा अपमान आम्ही सहन करणार नाही! आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाविकास आघाडीचे सरकार असताना केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला गेला होता. मात्र आताच्या मिंधे सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कोणतीही मागणी होत नाहीए. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला फटकारले आहे.

”मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आमच्या मविआ सरकारच्या काळात आम्ही प्रचंड प्रयत्न केले होते. आमचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्र सरकारशी सातत्याने पाठपुरावा केला होता, पुरावे सादर केले होते. परंतु महाराष्ट्राकडे केवळ ओरबाडून घेण्याच्या नजरेतून बघणाऱ्या दिल्लीश्वरांना महाराष्ट्राच्या मातीचा, परंपरेचा, भाषेचा आदर करावा असं कधीच वाटलं नाही. त्यांचा दिखाऊपणा केवळ मतांसाठीच! पण त्यामुळे अजूनही आपली मराठी भाषा ‘अभिजात’ दर्जापासून वंचित आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

यासोबतच आदित्य ठाकरे यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न तीव्र करणार असल्याचे देखील सांगितले आहे. हे सांगतानाच त्यांनी सध्याच्या भाजप नेत्यांची मराठी भाषेविषयी दिल्लीश्वरांशी बोलण्याची हिंमत नसल्याची टीका त्यांनी केली आहे. ”’गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमचीच सत्ता’ असा हट्ट असलेल्या राज्यातील भाजप नेत्यांचीही याबाबत वरिष्ठांशी बोलण्याची हिम्मत नाही. पण म्हणून महाराष्ट्राचा आणि मराठीचा असा अपमान आम्ही सहन करणार नाही! मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळावा ह्यासाठी आम्ही प्रयत्न अधिक तीव्र करणार आणि आमचं सरकार येताच मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळवून देणारच!