छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रक्रिया वेगाने करा!

छत्रपती संभाजीनगर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे तर नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास महाविकास आघाडी सरकारने मान्यता दिली होती. ती नामकरण प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, अशी विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पेंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांना आज केली.

उद्धव ठाकरे यांनी ज्योतिरादित्य सिंधीया यांना पत्र पाठवले आहे. अयोध्येतील विमानतळाचे ‘महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण करण्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो. या विमानतळामुळे जगभरातील यात्रेकरूंना प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला सहज पोहोचता येईल. गोव्यातील मोपा येथील विमानतळाचे नामकरण दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नावाने ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे केले गेले. तेसुद्धा स्वागतार्ह आहे, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

अयोध्या आणि गोव्यातील विमानतळांना 2 व्यक्तींची नावे देण्यात आली आहेत, हे पाहून आम्हाला खरोखर आनंद झाला आहे आणि या 2 विमानतळांना लागू होणारे नियम महाराष्ट्रातील 2 विमानतळांनादेखील लागू होतात का हे जाणून घेण्याची आमची इच्छा आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राला गेल्या दशकभरात सतत अशा अन्यायकारक वागणुकीचा सामना करावा लागला आहे याची आठवणही उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

n महाविकास आघाडी सरकारनेही छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबई विमानतळांच्या नामकरणास मान्यता देऊन ते दोन प्रस्ताव अनुक्रमे 2020 आणि 2022मध्ये पेंद्राच्या मान्यतेसाठी पाठवले. कोणत्याही व्यक्तींच्या नावावरून नव्हे तर विमानतळ जिथे आहेत त्या शहरांवरून विमानतळांचे नामकरण करण्‘याच्या पेंद्र सरकारच्या धोरणामुळे हा विलंब होत असल्याचे विविध स्तरांवरून आम्हाला सांगण्यात आले, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

संभाजी महाराजांचे नाव दुर्लक्षित करणे दुःखद

उद्धव ठाकरे यांनी पत्रामध्ये पुढे असे नमूद केले आहे की, महाविकास आघाडी सरकारने विमानतळांना ज्या 2 व्यक्तींची नावे दिली आहेत आणि पेंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवली आहेत, त्यांच्या परिचयाची वेगळी गरज नाही. तरीही लाल फितीच्या कारभारामुळे होणारा विलंब चिंतेचे कारण वाटते आणि श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला अशा प्रकारे दुर्लक्षित केले जात असल्याचे पाहून दुःखही होते. त्याचप्रमाणे दि.बा. पाटील यांचेही समाजासाठी मोठे योगदान आहे.