शिवसेनेत जोरदार इनकमिंग! घाटकोपर, उल्हासनगर, बीडमधील भाजप आणि मनसे पदाधिकारी शिवबंधनात

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. आज घाटकोपर, उल्हासनगर, बीड, अकोल्यातील भाजप आणि मनसेच्या पदाधिकाऱयांनी आपल्या हजारो समर्थकांसह ‘मातोश्री’ निवासस्थानी हाती शिवबंधन बांधले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

उल्हासनगरचे भाजप नगरसेवक राजेश वानखेडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. वानखेडे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. आज आपल्या घरात परत आल्यासारखे वाटतेय अशा भावना व्यक्त करतानाच, आपण पूर्वीही शिवसैनिक होतो आणि आजही आहे असे वानखेडे म्हणाले. वानखेडे यांनी अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी किणीकर यांच्याविरोधात मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा अल्पमताने पराभव झाला होता.

घाटकोपर येथील मनसेचे उपविभाग अध्यक्ष नीलेश जंगम आणि महिला उपविभाग अध्यक्षा मेघा सावंत यांनीही आज आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू, शिवसेना नेते-खासदार राजन विचारे, उपनेता सुषमा अंधारे, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, गुरुनाथ खोत, विभागप्रमुख सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

पालवी दिसतेय, कोंब दिसताहेत, उद्या शिवसेनेचा महावृक्ष होईल – उद्धव ठाकरे

बीडमधील काँग्रेस, भाजप, रिपब्लिकन सेना आणि वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला. बीडच्या निर्भीड शिवसैनिकांनो, तुम्ही निर्भीडपणे शिवसेनेत आलात, तुमचे स्वागत आहे, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी ‘शिवसेनेचा बालेकिल्ला… बीड जिल्हा, बीड जिल्हा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.

भाजपसोबत युती होती म्हणून गोपीनाथ मुंडे यांच्यावरील प्रेमाखातर शिवसेनेकडून बीड जिल्हा थोडासा दुर्लक्षित राहिला होता, पण आज पालवी दिसतेय, काsंब दिसताहेत, उद्या बीडमध्ये शिवसेनेचा महावृक्ष झालेला दिसेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्रामध्ये काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा शेतकऱयांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेना मेळावे घेत होती. त्यावेळी मराठवाडय़ात सर्वात मोठा मेळावा बीडमध्ये झाला होता अशी आठवण सांगतानाच त्याहीपेक्षा मोठा मेळावा बीडमध्ये घ्यायचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अभिनेते किरण माने शिवसेनेत

‘मुलगी झाली हो’ मालिका व ‘बिग बॉस मराठी’ या मालिकांमधून लोकप्रिय झालेले अभिनेते किरण माने यांनीही आज शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला. आज समाजातील वातावरण गढूळ झालेले आहे, संविधान धोक्यात आहे आणि अशावेळी उद्धव ठाकरे हे एकमेव असे नेते आहेत जे याविरोधात लढा देत आहेत. या लढाईत त्यांच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे खूप विचार करून आपण ही राजकीय भूमिका घेतली असे माने यावेळी म्हणाले. धर्मसत्ता आणि राजसत्ता जर एक झाल्या तर या प्रजेचे हाल कुत्रंही खाणार नाही हे प्रबोधनकारांचे वाक्य आज कुठेतरी खरे होऊ पाहतेय. अशावेळी एक संवेदनशील कलाकार व सजग नागरिक म्हणून आपण गप्प बसू शकत नाही. पक्ष देईल ती जबाबदारी मी मनापासून पार पाडेन, अशी ग्वाही यावेळी माने यांनी दिली.