“देशातील महिलाच मोदी सरकारला घरी पाठवणार”, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा

“महागाई आणि महिलांवरील अत्याचार हे देशातील महत्वाचे मुद्दे आहेत. या देशातील महिलाच हे सरकार बदलणार! हे ममता बॅनर्जींचं वाक्य आहे. कारण आज देशातील महिलांमध्ये संतापाचं वातावरण आहे. मणिपूर मधील घटना असो किंवा महिला कुस्तीपटूंच्या बाबतीत घडलेली घटना असो आता राज्यातील आणि देशातील महिलांनी निर्णय घेतला आहे की, हे सरकार बदलायला हवं. मोदी सरकार सत्तेत यावं यासाठी सर्वात जास्त प्रचार महिलांनी केला होता. महिलांच्या योगदानामुळेच मोदी सरकार आज सत्तेत आहे. आता याच महिला हे सरकार पुन्हा घरी पाठवणार आहेत.” असे टीकास्त्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले.

“मणिपूर फाईल्स कोणी दाखवो अथवा न दाखवो मात्र मणिपूरमध्ये आज जे होत आहे ते देशातच नव्हे तर संपूर्ण जगात दिसत आहे. महिलांची नग्न धिंड काढली जात आहे. अशा अनेक घटना मणिपूरमध्ये घडल्या आहेत व अजूनही घडत आहेत. मणिपूरमध्ये जवानांवर सामूहिक हल्ले होत आहेत, मात्र सरकार अजूनही मुकदर्शक बनून हा तमाशा पाहत आहे.” असे राऊत यांनी म्हटले.

“मणिपूरची अवस्था आज काश्मीरपेक्षाही भयंकर झाली आहे. काश्मीरमध्ये हिंदू- मुसलमान, हिंदुस्थान- पाकिस्तान असा मुद्दा असल्याने भाजप तिथे राजकारण करते. मात्र मणिपूरच्या हिंसाचाराचा भाजपला राजकीय फायदा नसल्याने ते या विषयावर गप्प आहेत. मणिपूरच्या हिंसाचारात एक जरी अल्पसंख्यांक समाजाचा व्यक्ती असता तर संपूर्ण देशात भाजपवाल्यांनी रान माजवलं असतं. मात्र मणिपूरसंदर्भात मोदी, केंद्र सरकार आणि तेथील राज्यपाल गप्प आहेत, ही दुर्भाग्याची गोष्ट आहे.” असे राऊत म्हणाले.

या देशाला महिला राष्ट्रपती लाभली असतानाही मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड निघते. मात्र राष्ट्रपतींनीही यावर आपली भूमिका व्यक्त केली नाही आणि त्यांनी यासंदर्भात सरकारलाही कोणताच आदेश दिला नाही. असे मत राऊत यांनी व्यक्त केले.