सर्व भ्रष्ट नेते, हाच भाजपचा परिवार; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर रविवारी हुकूमशाहीविरोधात इंडिया आघाडीची ललकारी घुमणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या महारॅलीसाठी उपस्थित नवी दिल्लीत आले आहेत. त्यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत भाजप आणि भाजपच्या भ्रष्ट परिवारावर हल्ला चढवला. भाजप म्हणजे आता भ्रष्ट जनता पार्टी झाली आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबईत येत आपल्याला भेटले होते. देशात आलेल्या हुकूमशाहीविरोधात एकजुटीने लढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. देशहितासाठी एकत्र येण्याबाबत त्यांनी पुढाकार घेतला होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना ज्या पद्धतीने अटक करण्यात आली, त्यावरून देशात हुकूमशाही येण्याची भीती नसून हुकूमशाही आलेली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. देशात खुल्या आणि निःपक्ष वातावरणात निवडणुका होण्याची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांवर भाजपने आरेप करत त्यांच्यावर दबाव आणून त्यांना पक्षात घेतले आणि त्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईलच बंद केल्या. सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर खोट्या केस टाकून त्यांना अटक करण्यात येत आहे. लोकशाहीसाठी हे चांगले लक्षण नाही. आपण सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहोत. सर्वत्र आपल्याला सरकारविरोधात संताप दिसून येत आहे. जनतेत सरकारविरोधात रोष आहे. महाराष्ट्रात गद्दारी करून महाविकास आघाडीचे सरकार पाडले आणि घटनाबाह्य सरकार स्थापन केले. आता इतर पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना त्यांनी सोबत घेतले आहे. त्यामुळे जनता निवडणुकीची वाट बघत आहे.

निवडणूक रोख्यांचा घोटाळ उघड झाल्यानंतर त्यांचे बिंग फुटले आणि केजरीवाल यांना अटक करण्यात आली. निवडणूक रोख्यांच्या घोटाळ्यात भाजप सर्वात मोठा लाभार्थी आहे. अनेक कंपन्यांवर धाडी टाकल्या, त्यानंतर भाजपला निवडणूक रोखे मिळाले किंवा रोखे दिल्यानंतर त्या कंपन्यांना मोठे कंत्राट मिळालेले आहे. हा सर्व घोटाळा उघड झाल्यावर जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी केजरीवाल यांना अटक करण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला.

नैसर्गिक युती म्हणत त्यांनी अनेक पक्षांना जवळ केले. आता अनेक भ्रष्टाचाऱ्यांना त्यांनी सोबत घेतले आहे. म्हणजे भ्रष्टाचार हा त्यांचा नैसर्गिक गुण आहे का, असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे वाटेल त्याला सोबत घेत ते निवडणुका लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या ताळमेळाबाबत विचार करा. महाविकास आघाडीचे सर्व उत्तम सुरू आहे. खरे ठग कोण आहेत, ते निवडणूक रोख्यांचा घोटाळा उघड झाल्यावर जनतेला कळले आहे. त्यामुळे जनतेचे लक्ष विचीलत करण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. ठगो का मेलामध्ये सर्व भाजपतील नेत्यांचे चेहरे दिसत आहेत, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठगांवर पंतप्रधान मोदी यांनी टीका केली होती. आता ते ठगच भाजपसोबत आहेत.

निवडणुकीपूर्वी प्रत्येक पक्षात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असते. महाविकास आघाडीत तीन महिने चर्चा झाल्यानंतर सर्व निश्चित झाले आहेत. प्रत्येक जागा जिंकण्याच्या इर्षेतूनच उमेदवार निवडण्यात आले आहेत. त्यामुळे आमच्यात कोणताही वाद नाही. महाविकास आघाडीत जागावाटपाचा विषय चर्चेतून सुटला आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मणीपूरला, लडाखला ,दार्जिलिंगला जाऊन तेथील समस्या जाणून घ्याव्या. नीरज झिंगा यांना दिलेली आश्वासेने कशी पाळण्यात आली नाही, ते जाणून घ्यावे. अरुणाचल प्रदेशमध्ये जाऊन समस्या समजून घ्याव्या. त्यांच्या जाण्यायेण्याचा राहण्याचा खर्च करण्यास आपण तयार आहोत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना लगावला.कश्मीरला जाऊन कश्मीरी पंडितांच्या समस्या जाणून घ्यावा. एखाद्या निर्मात्याला सोबत घेत त्यांनी मणीपूर फाईल्स असा चित्रपट काढावा, असे आव्हानही त्यांनी दिले.

फक्त माझा परिवार म्हणून काही होत नाही. परिवाराची जबाबदारी घ्यावी लागते. आपण मुख्यमंत्री असताना कोरोना महामारीचे संकट आले होते. त्यावेळी माझा परिवार, माझी जबाबदारी, असे आपण म्हणालो होतो. ती जबाबदारी आपण घेतली होती. आता ते फक्त माझा परिवार, माझा परिवार करत आहे. पण त्यांच्या परिवारात फक्त ते आणि खुर्ची आहेत. निवडणूक रोखे घोटाळा उघड झाल्यानंतर भाजप ही भ्रष्ट जनता पार्टी असल्याचे उघड झाले आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाही. त्यामुळे परिवार, घराणेशाही असे मुद्दे ते उचलून धरत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्व भ्रष्ट हाच त्यांचा परिवार आहे. आता ते एकाएका नेत्याला सोबत घेत वाचण्याचा प्रयत्न करत आहे. आता ते रसातळाला जाणार हे निश्चित आहे, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.