खासगी 140 बसेसकडून सहा लाखांचा दंड वसूल, श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाची मोहीम

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या तपासणी मोहिमेत 16 जुलैअखेर 350 बसेसची तपासणी करण्यात आली. यामध्ये 140 वाहने दोषी आढळल्याने त्यांच्याकडून 6 लाख 18 हजार 260 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांनी दिली आहे.

श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने विशेष तपासणी मोहीम 1 ते 31 जुलै 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. यामध्ये खासगी बसेसची तपासणी करण्यात येत असून, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱया चालकांची तपासणी करणे, वेग नियंत्रकामध्ये छेडछाड करणे, अग्निशमन यंत्रणा नसणे, विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करणारी वाहने, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, अवैध मालवाहतूक करणाऱया बसेस, वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, आपत्कालीन निर्गमन आणि दरवाजे कार्यरत स्थितीत नसणाऱया, योग्यता प्रमाणपत्र नसणे, जादा भाडे आकारणी, रिफ्लेक्टर टेप नसणे, इंडिकेटर असे मोटार वाहन कायद्यातील गुह्यानुसार तपासणी केली जात आहे.

या तपासणीमध्ये 16 जुलै अखेर 350 बसेसची तपासणी करण्यात आली असून, 140 बसेसवर 6 लाख 18 हजार 260 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. खासगी बस तपासणी मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. तसेच, खासगी बसेसमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास प्रवाशांनी श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.