पावसानंतरही पश्चिम रेल्वेवरील बिघाड संपेना! सकाळी ऐन गर्दीच्या वेळी दादर, अंधेरी येथे सिग्नलमध्ये बिघाड

पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रडतखडत धावणाऱया पश्चिम रेल्वेवरील बिघाड पावसानंतरही संपेनात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी दादर आणि अंधेरी स्थानकाजवळ सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले. त्यातच एसी लोकलचे दहिसर स्थनकात दरवाजे उघडले नाहीत. या बिघाडामुळे सकाळी पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक संपूर्ण कोलमडले होते.

लोकल गाडय़ांबरोबरच लांब पल्ल्याच्या गाडय़ा वेळेवर चालवण्यात पश्चिम रेल्वे आघाडीवर होती. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या मागे बिघाडाचे ग्रहण लागले असून वारंवार तांत्रिक बिघाड होऊन गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडत आहे. आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी आज सकाळच्या वेळी अंधेरी आणि दादर येथे पॉईंटमध्ये बिघाड झाल्याने अप आणि डाऊन मार्गावरील लोकल मंदगतीने धावत होत्या. चर्चगेट ते बोरिवली  जलद लोकल काही वेळ एकाच ठिकाणी थांबल्या होत्या. विरार ते चर्चगेट जाणाऱया अनेक लोकल रद्द करण्यात आल्याची उद्घोषणा करण्यात आली. लोकल बराच वेळ आली नसल्याने विरार, नालासोपारा, बोरिवली, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, दादर या स्थानकांत प्रवाशांची गर्दी जमली होती. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.