एक कप कॉफी… पण दुरावा कायम!

रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांनी त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्यासोबत कोणताही समेट झाला नसल्याचे आज स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर मुलाच्या घरी पुन्हा कधी जाणार नसल्याचे सांगितले. गौतम सिंघानिया यांनी अलीकडे वडील विजयपत सिंघानिया यांच्यासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. ‘आज माझे वडील घरी आहेत आणि त्यांचे आशीर्वाद मी घेत आहे. पापा तुमच्या आरोग्यासाठी सदैव शुभेच्छा’ अशी कॅप्शन लिहिली होती. त्यानंतर पिता-पुत्रामध्ये समेट झाल्याची चर्चा रंगली. विजयपत सिंघानिया यांनी मात्र या चर्चेत तथ्य नसल्याचे आज सांगितले.

गौतमचा सहायक मला घरी येण्यासाठी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा मी नकार दिला तेव्हा गौतम स्वतः ऑनलाईन आला आणि म्हणाला की, तो एका कप कॉफीवर माझी फक्त पाच मिनिटे वेळ घेईल. मी अत्यंत अनिच्छेने गेलो. मला माहीत नव्हते की, माझ्यासोबत फोटो काढून मीडियाला एक मजबूत संदेश पाठवण्याचा त्याचा हेतू होता. त्यानंतर काही वेळाने इंटरनेटवर गौतमसोबतचा फोटो झळकला आणि आमच्यामध्ये समेट झाल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे.

85 वर्षीय विजयपत सिंघानिया रेमंड ग्रुपच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांच्याकडे कंपनीची धुरा गेली. त्यानंतर वडील आणि मुलामधील संबंध बिघडले. विजयपत यांना 2018 मध्ये रेमंडच्या मानद अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले.