हॉलिवूड अभिनेता क्रिश्चियन ओलीव्हरचा विमान अपघातात मृत्यू, दोन्ही मुलींनीही गमावला जीव

‘स्पीड रेसर’ आणि ‘वाल्किरी’ यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये झळकलेला हॉलिवूड अभिनेता क्रिश्चियन ओलीव्हरचा (वय – 51) विमान अपघातात मृत्यू झाला आहे. गुरुवारी कॅरेबियन बेटांवर क्रिश्चियन ओलीव्हरचे (Christian Oliver) विमान क्रॅश झाले. यात त्याच्यासह दोन्ही मुली आणि विमानाचा पायलट रॉबर्ट सॅक्सचाही मृत्यू झाला.

अपघातग्रस्त विमान सिंगल इंजिनचे होते. गुरुवारी दुपारी या विमानाने बेक्वियाच्या जे.एफ. मिशेलर विमानतळावरून उड्डाण घेतले होते. सेंट ल्युसियाच्या दिशेने जात असताना हे विमान कोसळले. या अपघातामध्ये ओलिव्हरसह त्याची मोठी मुलगी मदिता क्लेप्सर (वय – 12) आणि एनिक क्लेप्सर (वय – 10) यांचाही मृत्यू झाला.

रॉयल सेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणानंतर काही वेळातच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि विमान समुद्रामध्ये कोसळले. विमान कोसळताच परिसरातील मच्छिमार आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत विमानातील सर्वांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्वांचे मृतदेह बाहेर काढून शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

दरम्यान, उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या पायलटने विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला असून समस्येचा सामना करावा लागेत असल्याचे रेडिओ संदेश पाठवला होता. त्यामुळे पायलटने विमान माघारी वळवले होते. मात्र त्यानंतर कोणताही संदेश आला नाही. याच दरम्यान विमानाचा अपघात झाला असावा, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. विमानाच्या अपघातामागील कारणांचा शोध सुरू असल्याचेही ते म्हणाले.

जर्मनीमध्ये जन्मलेल्या ओलीव्हरने ‘द गुड जर्मन’मध्ये केट ब्लँचेट आणि जॉर्ज क्लुनीसोबत स्टीव्हन सोडरबर्गसोबत काम केले होते. तर ‘वाल्किरी’मध्ये ब्रायन सिंगर आणि टॉम क्रूझसोबत आणि 2008मध्ये आलेल्या ‘स्पीड रेसर’ चित्रपटाही तो झळकला होता. यासह लोकप्रिय जर्मन एक्शन सीरिज ‘अलार्म फॉर कोब्रा-11’मध्येही त्याने एका गुप्तहेराची भूमिका साकारली होती. तसेच छोट्या पडद्यावरील ‘सेव्ह बाय द बेल – द न्यू क्लास’मध्येही काम केले होते.